28 February 2021

News Flash

निरोपासाठी मुंबई सज्ज!

गर्दीच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी सोमारी जय्यत तयारी करण्यात आली.    (छायाचित्र : गणेश शिर्सेकर)

पालिकेतर्फे विसर्जनाची चोख व्यवस्था; अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

गेले १२ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांसह अन्य विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी विसर्जनस्थळांवर तब्बल ८,६०४ पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला असून गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांनी समुद्रात उतरू नये यासाठी ५० जर्मन तराफे सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६०७ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली असून सुमारे ३६०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, ५०० वाहतूक वॉर्डन आदी सुरक्षा व्यवस्थेसाठी मुंबईभरात तैनात केले आहेत. संपूर्ण मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

गिरगाव, दादर, जुहू आदी विविध ठिकाणचे समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम तलाव आदी १०१ विसर्जनस्थळांवर गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक आणि हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकाही सज्ज झाली आहे. गिरगाव, दादर, जुहू या समुद्रकिनाऱ्यांसह ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि पालिकेच्या ३२ कृत्रिम तलावांवर भाविकांची अलोट गर्दी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने १०१ विसर्जनस्थळांवर ७४ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था केली असून तब्बल ६० रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. गणरायाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी तब्बल ८७ स्वागत कक्ष, गणेशमूर्तीसोबत विसर्जनस्थळांवर घेऊन येणाऱ्या निर्माल्यांसाठी २०१ निर्माल्य कलश, निर्माल्य वाहून नेण्यासाठी १९२ डम्पर, ११८ तात्पुरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनस्थळांवर रात्री लख्ख उजेड असावा यासाठी तब्बल १९९१ फ्लडलाईट आणि १३०६ सर्चलाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशमूर्तीची ट्रॉली अडकू नये म्हणून समुद्रकिनाऱ्यांवर वाळूमध्ये ८४० स्टील प्लेट टाकण्यात आल्या आहेत.

गणेश विसर्जनासाठी समुद्रात अथवा तलावांमध्ये उतरणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६०७ जीवरक्षकांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच ८१ मोटरबोट, ४८ निरीक्षण मनोरे, ४८ जर्मन तराफे सज्ज ठेवण्यात आले आहेत. विसर्जनस्थळावर उपलब्ध केलेल्या सुविधेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे २,४१७ अधिकारी आणि ६,१८७ कामगार उपस्थित राहणार आहेत.

पालिकेबरोबरच विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांनीही गिरगाव, दादर, जुहू आदी मुख्य विसर्जनस्थळांवर भाविकांना असुविधा होऊ नये म्हणून आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या भाविकांनी भुरटे चोर, समाजकंटक यांच्यापासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालावी यासाठी विसर्जनाच्या दिवशी वाहतूक पोलिसांच्या मदतीला एनसीसी, एनएसएसचे कॅडेट्स व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही असणार आहेत. तसेच नियंत्रण कक्षांसह टेहळणी मनोऱ्यांमार्फत मिरवणुकींवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. हरविलेली बालके किंवा व्यक्तींसाठी मदतकेंद्रे उभारण्यात आली असून तसेच याबाबतच्या उद्घोषणा करण्यासाठी मेगाफोनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांसाठी प्रथमोपचार व सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी तटरक्षक दल व नौदलाच्या मदतीने बोटी व लाँचेस उपलब्ध केल्या आहेत.

 • गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, बडा मस्जीद, वांद्रे, जुहू चौपाटी आणि गणेश घाट (पवई) या पाच ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षांची उभारणी.
 • एकूण ११९ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
 • ५३ रस्ते वाहतुकीसाठी बंद
 • ९९ रस्त्यांवर पार्किंगला मज्जाव.
 • ५४ मार्गावर एकदिशा वाहतूक.

हे रस्ते बंद

 • दक्षिण मुंबईतल्या काळबादेवी भागातील जगन्नाथ शंकर शेठ मार्ग, सी. पी. टँक मार्ग, संत सेना मार्ग.
 • मलबार हिल भागातील व्ही. पी. मार्ग आणि सरदार वल्लभभाई पटेल मार्ग
 • भायखळा भागातील दत्ताराम लाड मार्ग, साने गुरुजी मार्ग.
 • भोईवाडा परिसरातील डॉ. ई. बोर्जेस आणि जेरभाई वाडिया मार्ग.
 • दादर विभागामध्ये रानडे मार्ग, शिवाजी पार्क ३ व ४ मार्ग, एन. सी. केळकर मार्ग
 • घाटकोपरमधील लाल बहादूर शास्त्री मार्ग
 • सांताक्रूझ, दिंडोशी आणि डी. एन. नगर भागातील महत्त्वाचे रस्ते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 3:01 am

Web Title: ganesh visarjan 2017 bmc mumbai police security
Next Stories
1 उपनगरांतील ५००हून अधिक खासगी इमारतींना फटका!
2 स्वागताप्रमाणे पाठवणीही खड्डय़ांतूनच
3 अखेर जीवरक्षकांना विमाकवच
Just Now!
X