पूर्व उपनगरातील अनेक भागांत रस्त्यांची चाळण

गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे भरले जातील, असे आश्वासन दरवर्षी पालिका नागरिकांना देत असते. मात्र पालिकेकडून काही ठरावीक रस्त्यांवरील खड्डेच भरले जात असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पूर्व उपनगरात तर दरवर्षी हीच परिस्थती असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर महिनाभरातच शहरातील रस्त्यांची पूर्णपणे दुरवस्था झाली होती. गणेशोत्सवापूर्वी तरी पालिका हे खड्डे भरेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र काही ठरावीक रस्त्यांवरील खड्डे वगळता संपूर्ण मुंबईत मोठय़ा प्रमाणात खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. पूर्व उपनगरातील काही रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडची तर पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. एकीकडे याच मार्गावर एका उड्डाणपुलाचेदेखील काम सुरू आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी असताना रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. अशाच प्रकारे सायन-पनवेल मार्गाचीदेखील अवस्था खराब असून मानखुर्द आणि चेंबूर पांजरापोळ सर्कल येथे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने येथील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावरदेखील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथील कामराज नगर, रमाबाई नगर, घाटकोपर बेस्ट डेपो, एलीबीएस मार्ग, सवरेदय रुग्णालय रोड, गोळीबार रोड, विक्रोळीतील कन्नमवार नगर, कुल्र्यातील रेल्वे स्थानक रोड, चुनाभट्टी तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातदेखील मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. टर्मिनस समोरच संपूर्ण रस्ताच खड्डय़ात गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक लहान वाहने अडकत असल्याची माहिती एका वाहन चालकाने दिली आहे.

खडी टाकून मलमपट्टी

पालिकेने अनेक ठिकाणी गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले आहेत. मात्र या खड्डय़ामध्ये केवळ खडी टाकून त्यावर मलमपट्टी केली आहे. या खडीमध्ये केवळ नावापुरतीच डांबर मिसळली जात असल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर काही तासातच ही खडी पुन्हा बाहेर निघते. परिणामी ही खडी रस्त्यावर पसरत असल्याने यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे अपघातदेखील होत आहेत.