लालबाग-परळ ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या विसर्जन मिरवणुकांत शिरून पाकिटमारी, मोबाइल आणि सोनसाखळी चोरीसारखे गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. यापैकी एक टोळी उत्तर प्रदेशची तर दुसरी बीड-अहमदनगरची असल्याचे सांगण्यात आले. या टोळ्यांकडून भाविकांचे चोरलेले मोबाइल, सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती, त्यांच्या विसर्जन मिरवणुका पाहाण्यासाठी शहरात लालबाग-परळ ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या मार्गात प्रचंड गर्दी होते. ती संधी साधून मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टोळ्या परराज्यांतून शहरात येतात. हा अनुभव गाठीशी असल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी काळाचौकी, भोईवाडा आणि हद्दीतील अन्य पोलीस ठाण्यांवर अशा चोरांना पकडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी दिवसभरात मोनू यादव, आकाश शकवार या उत्तर प्रदेशच्या दोन चोरटय़ांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे १३ मोबाइल हस्तगत केले. अरबाज मिर्झा, नवगन चव्हाण आणि रोहित जाधव या मुंबई व बीडच्या चोरटय़ांकडे ९ मोबाइल सापडले. त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी एका आरोपीला सोनसाखळी चोरताना रंगेहाथ पकडण्यात आले.

विसर्जन मिरवणुकांमध्ये हात साफ करून बीड-अहमदनगरची टोळी परतीच्या प्रवासाला लागल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चेंबूर कक्षाला मिळाली. त्यानुसार पथकाने गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात सापळा रचून वाशीच्या दिशेने निघालेल्या संशयित स्कॉर्पिओ कारला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कार भरवेगात पुढे निघून गेली. पाठलाग करून ही कार थांबवण्यात पथकाला यश आले. या कारमधून ज्ञानेश्वर जाधव, अमोल गायकवाड, अमोल पिटेकर, अमोल जाधव, अशोक जाधव, नितीन जाधव, नितीन गायकवाड आणि इरफान पठाण या चोरटय़ांना चोरलेल्या मोबाइल, दागिन्यांसह अटक करण्यात आली.

पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सवात विशेषत: लालबाग परिसरात मौल्यवान वस्तू गहाळ किंवा चोरी झाली असल्यास काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी केले आहे.