पुलाचा भाग कोसळताच नियंत्रण कक्षाला सूचना; तातडीने हालचाली करून जखमींची सुटका

अंधेरी स्थानकातील रुळावरील यार्डमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा रवाना करण्यासाठी गेलेले पॉइंट्समन गणेश वर्के यांनी पुलाचा भाग कोसळताना पाहिले आणि प्रसंगावधान राखून त्यांनी त्वरित त्याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे रेल्वेचा नियंत्रण कक्ष सावध झाला आणि मोठी दुर्घटना टळली.

अंधेरी यार्डमध्ये उभी असलेली ८.०३ वाजताची चर्चगेट लोकल रवाना करण्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे यार्डमध्ये वर्के गेले होते. तोच मोठा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी मागे वळून पाहिले तर समोर पुलाचा भाग कोसळला होता. त्यांनी त्वरित वॉकीटॉकीवरून त्याची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्ष सावध झाला आणि पुढचा अनर्थ टळला.

यार्डमधून चर्चगेटला जाणारी सकाळी ८.०३ ची लोकल अंधेरी स्थानकात दाखल होण्याच्या मार्गावर होती. मात्र समोर पूल कोसळल्याचे दिसताच मोटरमनने जागच्या जागी गाडी थांबवली. घटना घडली त्याच्या एक मिनिटापूर्वीच विरार जलद लोकल त्या पुलाखालून रवाना झाली आणि पुढे जाऊन फलाट क्रमांक सहावर थांबल्याची माहिती गणेश यांनी दिली. लोकल थांबल्यानंतर आपण घटनेच्या ठिकाणी जाऊन जखमी झालेल्या प्रवाशांना उचलून रुग्णवाहिकेत दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेच्या आधी काही मिनिटांपूर्वी फलाट ८ वरून वांद्रे-सुरत इंटरसिटी रवाना झाली होती. त्यानंतर ७.३८ वाजताची जलद डहाणू लोकल फलाट ८ वर येणार होती. त्यातून प्रवासी उतरतील आणि सामान वाहायला मिळेल म्हणून फलाटावरच गाडीच्या प्रतीक्षेत थांबलो होतो. तोच काही क्षणात जोराचा आवाज कानावर पडला. समोर पाहतो तर पूल कोसळला. धावत तेथे जाऊन जखमींना उचलून रुग्णवाहिकेत दाखल केले. पॉइंटसमन व मोटारमनने आधीच माहिती दिल्यामुळे त्वरित रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या होत्या, अशी माहिती अंधेरी स्थानकातील फलाटावर हमाल म्हणून कार्यरत असलेल्या सपकाळ यांनी दिली.