देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवावरही करोनाचं सावट आहे. यावर्षी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. तर दुसरीकडे गणरायाच्या विसर्जनासाठीही नवी नियमावली मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केली आहे.

या वर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्रदेखील विभाग स्तरावर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्थळं आहेत. यावर्षी गेल्या वर्षीच्या पाच पटीने अधिक म्हणजेच १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. तसेच सोसट्यांच्या आवारात कंटेन्मेंट झोनमध्ये तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे देखील तयार करण्यात आली आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्णत: गर्दी टाळून करणे बंधनकारक राहणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

नैसर्गिक विसर्जनस्थळं तसेच कृत्रिम विसर्जन स्थळांपासून १ ते २ कि.मी राहणाऱ्या लोकांनी त्याचा वापर करावा. अशा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही. या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली जाईल. त्या ठिकाणी मूर्तींचं विसर्जन पालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचंही नियमावलीत म्हटलं आहे.

घरगुती गणपतींचे आगमन हे दरवर्षी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी केले जाते. मात्र यंदा कोरोनाची स्थिती लक्षात घेता गणेशचतुर्थीच्या तीन ते चार दिवस आधी मूर्तींचे आगमन करावं, असं आवाहनही मुंबई महानगपालिकेनं केलं आहे.

फिरते कृत्रिम तलाव

गणेशोत्सवाला अवघे तीन-चार दिवस उरलेले असून या वर्षीचे गणेश विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर विसर्जनासाठी यंदा अनेक बंधने घालण्यात आली आहेत. यंदा घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी एका वेळी पाचपेक्षा जास्त भाविकांनी येऊ नये तसेच विसर्जनस्थळी आरती करू नये, अशी बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी नवे सुरक्षित उपाय पालिकेच्या सर्वच विभागांनी पुढे आणले आहेत. त्यात वांद्रे पूर्व आणि पश्चिम व अंधेरी पूर्वचा भाग असलेल्या परिमंडळ ३ मध्ये एकत्रित अशी उपाययोजना करण्यात येणार आहे. या भागात नैसर्गिक विसर्जन स्थळांबरोबरच कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात येणार आहेच; पण त्याचबरोबर मालवाहू ट्रकवर आकर्षक असे कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. विभागात ठरावीक ठिकाणी हे ट्रक उभे केले जाणार आहेत, अशी माहिती एच पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली. हे ट्रक मूर्तींनी पूर्ण भरले की मग ते विसर्जनस्थळी नेऊन गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.