मुंबई : दहावीला ९५ टक्के गुण मिळालेल्या राजेशला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. अभियंता बनण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या राजेशने घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कला शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. अशी अनेक गुणवत्ताधारक अल्पभूधारक, शेतमजूर तसेच दरिद्रय़रेषेखालील घरातील मुले केवळ पैसे नाहीत म्हणून मनाजोगे शिक्षण घेऊ शकत नाही. या मुलांच्या मदतीसाठी आता मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सरसावली असून ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

राज्य शासनाकडून विविध संवर्गाना शिक्षणासाठी वेळोवेळी सवलती देण्यात येतात. आदिवासीसह वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सवलती देण्यात येत असल्या तरी यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुरांसह अनेक गरीब परंतु हुशार विद्यार्थी शैक्षणिक फीमधील सवलतींपासून वंचित राहतात हे लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी अल्पभूधारक, शेतमजुरांसह जो घटक शासकीय शैक्षणिक सवलतींपासून वंचित राहात असेल अशा वर्गासाठी धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शिक्षणाचा खर्च उचलण्याची अभिनव योजना आखली.

या अंतर्गत दहावीला ज्या गरजू व हुशार मुलांना ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असतील त्यांना ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्या शिक्षणाचा खर्च सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उचलावा, अशी संकल्पना मांडली. यासाठी नुकतीच शिवकुमार डिगे यांनी मुंबईतील संबंधित गणेशोत्सव मंडळांची एक बैठक बोलावली. या बैठकीला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय मंडळ, लालबागचा राजा, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, अरुणोदय गणेश मंडळ, लालबाग सार्वजनिक गणेश मंडळ, श्री बाळगोपाळ सार्वजनिक मंडळ (फोर्टचा राजा), नेहरू नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गजानन मित्र मंडळ ठाणे आदी अनेक मंडळे सहभागी झाली होती.

या मंडळांनी दारिद्रय़ रेषेखालील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आदींच्या गुणवत्ताधारक मुलांचा दहावीनंतरच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. याबाबत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांना विचारले असता ते म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागे एक दृष्टिकोन होता. आजच्या काळात अनेक गणेशोत्सव मंडळे त्यांच्याकडे जमा होणाऱ्या निधीतून काही चांगली कामे करीत असतात. याला एक व्यापक दृष्टिकोन देऊन समाजातील खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमागे या गणेशोत्सव मंडळांनी उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका मी मांडली व सर्व मंडळांनी ती स्वीकारली.

पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी प्रत्येक जिल्हय़ातील दहावीच्या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचीच निवड  केली जाणार असली तरी आगामी काळात त्यात अन्य सेवाभावी संस्थांना सहभागी करून ही योजना व्यापक प्रमाणावर राबवता येऊ शकेल.

प्रत्येक जिल्ह्यतून किमान दहा मुलांची निवड

या योजनेअंतर्गत दहावीला ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यतील किमान दहा मुलांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर गणेशोत्सव मंडळांची एक समन्वय समिती नेमण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा भार गणेशोत्सव मंडळांकडे जमा होणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे.