भक्ती परब

गणेशोत्सवातील वाद्यांच्या बाजाराला मनुष्यबळाअभावी घरघर

मनोभावे गणरायाची आरती करताना त्याला मिळणारी वाद्यांची जोड वातावरण भारून टाकते. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात तबला, डग्गा, पखवाज, मृदंग अशा वाद्यांना किंवा त्यांची दुरुस्ती करणाऱ्यांना मोठी मागणी असते. वर्षभर यथातथा चालणाऱ्या या बाजारात गणेशोत्सवाच्या काळात मात्र लाखोंची उलाढाल होते. मात्र, ही वाद्ये घडवणारे कारागीर आता पुरेसे उपलब्ध नसल्याने अनेक दुकानांना आपला गाशा गुंडाळावा लागत आहे.

ढोलकी या वाद्याला गणेशोत्सवात सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के मागणी असते. तर पखवाजाला ५० टक्के मागणी असते. आणि इतर वाद्यांना मागणीचे प्रमाणही साधारणपणे २० टक्के असते. गणेशोत्सवात मागणी वाढत असल्याने लालबागच्या परिसरात एका ओळीत असलेली चर्मवाद्यांची दुकाने एकेकाळी गजबजून जात असत. मात्र, सध्या अशी गजबज पाहायला मिळत नाही. एकेकाळी याठिकाणी चर्मवाद्यांची ५० दुकाने होती. मात्र, आता येथे १० ते १२ दुकानेच येथे दिसून येतात.

वाद्यांना दरवर्षी मोठी मागणी असली तरी, ती घडवणारे कारागीर नसल्यामुळे हा बाजार आता आक्रसू लागला आहे. जी दुकाने उरली आहेत, त्यातील बहुतांश कारागीर हे परंपरागत व्यवसाय म्हणून येथे काम करत आहेत. सहाजिकच मनुष्यबळाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या दुकानांतील हाताना अजिबात सवड मिळत नाही.

‘कामाच्या तुलनेत कारागीर उपलब्ध नाहीत. ही पिढीजात कला जोपासण्यात आम्हाला तरुण कलाकारांची उणीव भासते आहे,’ असे या व्यवसायातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी सुरेश चव्हाण सांगतात.

चव्हाण यांचे चर्मवाद्यांचे दुकान वर्षभर सुरू असते. पण गणपतीच्या दिवसात वाद्यांना खूप मागणी असते. केवळ गणेशोत्सवात वाद्यांच्या दुकानांची उलाढाल २० ते २५ लाखांपर्यंत जाते, असे येथील दुकानदार सांगतात.  चव्हाण यांच्या दुकानात बनवल्या जाणाऱ्या वाद्यांसाठी लागणारे लाकूड गुजरात, उत्तर प्रदेश, अमरोहा या भागातून येते. तर चामडय़ाची वादी सोलापूर भागातून येते. ५० ते ६० हजाराच्या कच्चा सामानाची खरेदी त्यांना गणेशोत्सवाच्या आधी दोन महिने करावी लागते. याचे १०० पर्यंत नग होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी सांगितला. यातले कुठलेही काम यंत्राच्या साहाय्याने होत नसल्यामुळे इथे कुशल कारागीर लागतो. काम खूप वेळखाऊ असते. आठ-दहा दिवस चामडय़ाची वादी तयार करायला लागतात. तसेच, इथे काम करणाऱ्या मंडळींना स्वरांचे ज्ञान असावे लागते. ते उत्तम कानसेन असावे लागतात, अशी माहिती दुकानदार देतात.

नव्या पिढीची साथ हवी

चर्मवाद्ये घडविणाऱ्या कलाकारांच्या भावी पिढीची पिढीजात कला जोपासण्याबाबत असलेली अनास्था, कलाकारांची घटती संख्या यामुळे मुंबईत चर्मवाद्यांची विक्री, दुरुस्ती करणारी फार कमी दुकाने उरली आहे. या व्यवसायाला कारागिरांची कमतरता भासते आहे. नव्या पिढीने ही कला शिकून घ्यावी आणि हा वारसा पुढे न्यावा. अशी अपेक्षा इथे राबणारे कारागीर व्यक्त करत आहेत.