घोडबंदर रोडवरील डोंगरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली. सुरेश बिष्णोई, सुभाष बिष्णोई, शामलाल बिष्णोई आणि श्रवण बिष्णोई या चौघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ७२ सिलेंडर जप्त केले आहेत.
कासारवडवली येथील पुराणिक इस्टेटच्या मागील जंगलात एलपीच्या घरगुती सिलेंडरमधून एका नळीच्या सहाय्याने व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. हा सिलेंडर जास्तीच्या किमतीमध्ये विकला जात असल्याची माहिती कासारवडवली पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलीसांनी छापा टाकून सुरेश बोष्णोई यास अटक केले. इतर पसार साथिदारांना पोलिसांनी गुरुवारी मुंबईतून अटक केली. ही टोळी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काळाबाजार करत होते. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.