नालासोपारा (प.) येथे बबली अपार्टमेंटमध्ये असलेल्या अ‍ॅक्सिस बँक व एटीएम शाखेची आणि तालुक्यातून विविध एटीएम शाखांतून जमा केलेली सुमारे पावणेचार कोटींची रक्कम आज भरदुपारी सशस्त्र दरोडेखोरांनी लुटून नेली.
बँकेतून व एटीएममधून जमा केलेली रोकड पेटय़ांमध्ये भरून निघालेल्या व्हॅनमागे एक हिरव्या रंगाची क्वालिस गाडी उभी होती. त्या गाडीतून उतरलेल्या पाच-सहा जणांच्या हातात चॉपर व सळया होत्या. त्यांनी बँकेच्या गाडीवर सळया मारून दहशत निर्माण केली. गाडीच्या दुसऱ्या बाजूने कोणी पुढे येऊ नये म्हणून चॉपर घेऊन दोघे उभे होते. गाडीवर रॉड मारल्याबरोबर मोहन कांबळे व चंद्रकांत पाटील हे रक्षक गाडीबाहेर आले. त्यांच्या डोक्यावर हॉकीच्या काठय़ा मारण्यात आल्या व पिस्तुलचा धाक दाखवण्यात आला. त्यामुळे ते जिवाच्या आकांताने बँकेत पळाले आणि काही क्षणातच तीन-चार पेटय़ा क्वालिसमध्ये भरून क्वालिस मनवेलपाडय़ातून विरारच्या दिशेने गेली. नंतर क्वालिस गाडी मनवेलपाडा येथे सोडून दरोडेखोर फरारी झाले. विशेष म्हणजे व्हॅनमधील रखवालदारांकडे किंवा चालकाकडेही कोणतेच शस्त्र नव्हते. पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार, वसईचे पोलीस उपअधीक्षक दीपक देवराज हे पुढील तपास करीत आहेत.