अंधेरी येथील साकिनाका जरीमरी परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले.
अंधेरी येथून कुर्लाला जाण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री या तरुणीने रिक्षा केली. यावर एकटी तरुणी आपल्या रिक्षाने प्रवास करत असल्याची माहिती भ्रमणध्वनीहून चालकांने त्याच्या मित्रांना दिली. त्यानुसार साकिनाका जरीमरी येथे रिक्षा थांबवण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी आधीपासून हजर असलेल्या तीन जणांनी या तरुणीला बळजबरीने सुभाष नगर येथील एका घरात आणले. या घरात आगोदरच तीन जण होते. यानंतर या सहाही जणांनी या तरुणीवर अत्याचार करुन तिला रस्त्यावर सोडून दिले.
या प्रकरणानंतर घाबरलेल्या तरुणीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर तातडीने साकिनाका पोलिसांनी या तरुणीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तरुणीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्याआधारे पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.