सुरतहून वांद्रे स्थानकात उतरलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घाटकोपर येथील पंतनगर परिसरात राहणारी पीडित तरुणी नोकरीच्या शोधात सोमवारी घरातून बाहेर पडली होती. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी ती सुरतला गेली; परंतु तिच्या प्रियकराशी संपर्क न झाल्याने बुधवारी मुंबईत परतली. बुधवारी तिने घरी जाण्यासाठी एक रिक्षा केली. मात्र रिक्षाचालकाने तिला घाटकोपरला न नेता नालासोपाऱ्यात नेले. त्यामुळे तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने तिची सुटका केली. रात्र खूप झाल्याने त्याने या तरुणीला आपल्या घरात झोपण्यासाठी नेले. तेथे या तरुणाच्या तीन मित्रांनी या तरुणीवर बलात्कार केला. सकाळी हा मोटारसायकलस्वार तरुण घरी आला असता तिने त्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार न करता ती घाटकोपरला घरी गेली. तेथे तिच्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथे तीन अज्ञात तरुणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी निर्मलनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ही तरुणी देत असलेल्या जबानीत अनेक विसंगती असून पोलीस त्याची शहानिशा करीत आहेत. दरम्यान, निर्मलनगर पोलिसांनी काही रिक्षाचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.