मुंबईत माणुसकीला लाजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड पश्चिमेला मालवणीमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका भटक्या कुत्र्यावर चौघा विकृतांनी बलात्कार केला. या कुत्र्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेने या कुत्र्याला पशूवैद्यकीय डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल केले होते. डेक्कन क्रॉनिकलने हे वृत्त दिले आहे.

मालवणी चर्च परिसरात दिसणाऱ्या या कुत्र्याला स्थानिक रहिवाशी सुधा फर्नांडीस नेहमी खायला द्यायच्या. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांना हा कुत्रा चर्चजवळ निपचित पडलेला दिसला. त्याच्यामध्ये अजिबात त्राण नव्हते. माझ्या नवऱ्याने सर्वप्रथम या कुत्र्याला पाहिले. त्यांनी मला त्याच्या स्थितीची माहिती दिली. त्याला अन्नाची गरज असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर मी त्याला खायला घेऊन आले.

मी त्या कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो घाबरला. त्याने अंग काढून घेतले. मी त्याच्यासमोर जेवण ठेवल्यानंतर त्याने ते सर्व व्यवस्थित खाल्ले. जेव्हा त्याच्या शरीराच्या खालच्या भागाकडे माझे लक्ष गेले. तेव्हा तिथून रक्तस्त्राव सुरु होता. तो गंभीर जखमी झाला होता. जमिनीवर पड़लेल्या अवस्थेत जेव्हा तो कूस बदलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला प्रचंड वेदना होत होत्या असे फर्नांडीस यांनी सांगितले.

परिसरातील एका रिक्षाचालकाने मध्यरात्रीच्या सुमारास या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार होताना पाहिले होते. त्यानेच चार अज्ञात आरोपींनी या कुत्र्यावर बलात्कार केल्याचे फर्नांडीस यांना सांगितले. ड्रग्जच्या नशेमध्ये असलेल्या चौघांनी हे कृत्य केले. कुत्र्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याने त्या रिक्षाचालकाने सांगितले. कुत्र्याचा आवाज ऐकून जेव्हा रिक्षा चालक तिथे पोहोचला तेव्हा चारही आरोपी तिथून फरार झालेले होते.

‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेला समजल्यानंतर ते या कुत्र्याला पूशवैद्यकीय डॉक्टरकडे घेऊन गेले. बलात्काराचा या कुत्र्यावर प्रचंड आघात झाला होता. उपचारा दरम्यान अनोळखी व्यक्ती जवळ गेल्यानंतर हा कुत्रा किंचाळायचा. त्याला भिती वाटत होती. या कुत्र्यावर उपचारास विलंब झाला. मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात इन्फेकशन झाले होते. औषधांनी हे इन्फेकशन कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच त्याने प्राण सोडला.