News Flash

सुरतचा उपाहारगृह चालक ते ठाण्याचा ‘गँगस्टर’

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दोन वर्षांमध्ये अनेक हस्तकांना बेडय़ा ठोकल्याने सुरेश हतबल होता.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘अण्णा’च्या अटकेने सुरेश पुजारी टोळीला धक्का

सुरतच्या कारागृहातील बंदींना डबे पोहोचवता पोहोचवता निर्माण झालेल्या ओेळखींच्या आधारे मुंबई, ठाण्यातील संघटित गुन्हेगारीत आपले वलय निर्माण करणाऱ्या सुधाकर ख्रिस्तोप्रिया ऊर्फ अण्णा याच्या अटकेने कुख्यात गुंड सुरेश पुजारीला जबर धक्का बसला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दोन वर्षांमध्ये अनेक हस्तकांना बेडय़ा ठोकल्याने सुरेश हतबल होता. अशा वेळी अण्णाच्या जोडीने त्याच्या कारवायांना पुन्हा जोर चढला होता.

अण्णा मूळचा उडिशाचा. त्याचे कुटुंब आजही तिथेच वास्तव्यास आहे. मात्र पोटापाण्यासाठी गुजरातला आल्यानंतर सुरतच्या कारागृहाबाहेर आधी टपरी व नंतर उपाहारगृह थाटून अण्णाने व्यवसाय सुरू केला. आतल्या अधिकाऱ्यांसह कैद्यांना डबे, जेवणाचे ताट, खाद्य पदार्थ, अन्य वस्तू पोहोचवण्याचे काम अण्णा करत असे. हळूहळू अण्णा जेवणासोबत निरोप्या म्हणूनही काम करू लागला. आतल्यांचे निरोप बाहेर व बाहेरच्यांचे निरोप आत देऊ लागला. त्यातून अण्णाची ओळख वाढली. सुरतच्या कारागृहात बंद असलेला एकन्एक कैदी अण्णाला ओळखू लागला. वर्षभरापूर्वी त्याचे उपाहारगृह रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने तुटले. त्यामुळे अण्णा बेरोजगार झाला.

एव्हाना झालेल्या ओळखीने त्याने कारागृहातून बाहेर पडलेल्या अनेकांदा फोन करून काम देण्याची विनंती केली होती. हे करता करता तो कुख्यात गुंड सुरेश पुजारी याच्या एका हस्तकाच्या संपर्कात आला. त्याने परदेशात दडून बसलेल्या सुरेशसोबत अण्णाचे बोलणे करून दिले.

गेल्या सहा महिन्यांपासून अण्णा सुरेशच्या संपर्कात आहे. अण्णाला पैसे हवे होते तर सुरेशला गुन्हेगारी कारवायांसाठी विश्वासू माणसे. ती अण्णाने पुरवण्याचा बंदोबस्त केला. अलीकडे सुरेशच्या सांगण्यावरून नालासोपारा येथील हॉटेल व उल्हासनगरातील वाईनशॉपवर गोळीबार घडला.

हा गोळीबार करणारे राज चौहान व अली अब्बास खान हे दोन हल्लेखोर अण्णाने पुरवले होते. नालासोपारा येथे राहणाऱ्या व सुरेशच्या विश्वासू हस्तकाने हल्ल्यासाठी अण्णाला शस्त्रे पुरवली होती. त्याचा शोध मुंबई गुन्हे शाखेने सुरू केला आहे.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गेल्या आठवडय़ात शुक्रवारी कुल्र्यातून या तिघांना अटक केली. सुरेशने पाठवलेल्या अडीच लाखांची वाटणी व पुढील गुन्हेगारी कारवायांची आखणी यासाठी तिघे भेटले होते.

हे तिघे मुंबईत भेटले यावरून येथील व्यावसायिक, व्यापाऱ्यांना ही टोळी लक्ष्य करणार होती का, याचा तपास पथकाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुजारीला अण्णाचा आधार

मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका व्यावसायिकाला सुरेश पुजारीने पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावले होते. त्या प्रकरणात मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने सुरेशच्या ९ हस्तकांना बेडय़ा ठोकल्या होत्या. गेल्यावर्षी उल्हासनगरातील सुमित चक्रवर्ती यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांसह पाच जणांना खंडणीवरोधी पथकानेच अटक केली होती. त्यामुळे दोन वर्षांत सुरेशची संपूर्ण टोळीच मुंबई गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केली होती. अशा वेळी अण्णाच्या साथीने पुजारी टोळीने आपले बस्तान पुन्हा मांडले होते.

उल्हासनगरातील राजकारणी रडारवर

उल्हासनगरातील वादग्रस्त राजकारणी सुरेशचे पुढले लक्ष्य होते, अशी माहिती समोर येते आहे. या माहितीची शहानिशा गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसही करणार आहेत. ‘हा राजकारणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांचा हस्तक आहे. तसेच त्याने उल्हासनगरात आपल्याविरोधात अपप्रचार केला आहे. माझे पोलिसांशी वाकडे नाही. या राजकारण्याला पोलीस संरक्षण आहे. त्यामुळे त्याच्यावरील हल्ल्यात सोबतच्या पोलिसांना काही झाले तर या शक्यतेने अद्याप काही केलेले नाही,’ असे पुजारीने एका स्थानिक व्यक्तीला दूरध्वनीवरून सांगितले होते. उल्हासनगर शहरात या दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफीत सध्या गाजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 4:47 am

Web Title: gangster anna arrested gangster suresh pujari
Next Stories
1 मुंबई आणि नवी मुंबई खाडीलगत ‘रशियन पाहुणा’
2 ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा’
3 करिअरची गुंतागुंत सोडवणारा ‘मार्ग यशाचा’
Just Now!
X