कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनासोबत अन्य तीन आरोपींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजनवर २०१५ मध्ये पनवेलमधील बिल्डर नंदू वाझेकर यांनी धमकावून २६ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

२०१५ मध्ये नंदू वाझेकर यांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. या बदल्यात एजंट परमानंद ठक्कर (सध्या फरार आहे) याला दोन कोटी रुपये देण्याचं ठरलं होतं. पण परमानंद ठक्करला अजून पैसे हवे होते. पण वाझेकर यांनी ते पैसे देण्यास नकार दिला. यानंतर ठक्करने छोटा राजनशी संपर्क साधून वाझेकर यांनी धमकावून दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्याचा आग्रह केला.

छोटा राजनने आपली माणसं पाठवून धमकावलं –
छोटा राजनने यानंतर आपल्या काही लोकांना वाझेकर यांच्या कार्यालयात पाठवलं आणि धमकावण्यास सुरुवात केली. या लोकांनी दोन कोटींच्या जागी वाझेकर यांच्या २६ कोटींची मागणी केली. तसंच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर वाझेकर यांनी पनवेल पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी छोटा राजनसोबत सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दाद्या आणि सुमित विजय मात्रे आरोपी आहेत. परमानंद ठक्कर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना छोटा राजनच्या लोकांनी कार्यालयात जाऊन वाझेकर यांना धमकावल्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. याशिवाय छोटा राजन धमकावत असल्याचं कॉल रेकॉर्डिंगही मिळालं आहे.

छोटा राजनला भारतात आल्यानंतर त्याची सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात आली होती ज्यामध्ये या प्रकरणाचाही समावेश होती. याच प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निर्णय दिला आहे.