कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेची लिलाव प्रक्रिया आज पार पडते आहे. दक्षिण मुंबईतील पाकमोडिया रस्त्यावरचे हॉटेल दिल्ली जायका, दाऊदची हिरव्या रंगाची सेदान गाडी आणि त्याच्या नावे माटुंग्यात असणाऱ्या घराचा यावेळी लिलाव करण्यात येईल. मुंबईच्या हॉटेल डिप्लोमेटमध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. माजी पत्रकार एस. बाळकृष्णन, दिल्लीस्थित वकील अजय श्रीवास्तव आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी या लिलावात बोली लावणार आहेत.  दरम्यान, दाऊदच्या गाडीसाठी ३.२० लाखांची बोली लावण्यात आली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांच्याकडून ही बोली लावण्यात आली.
लिलावाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी हॉटेल डिप्लोमेटच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. लिलाव होणाऱ्या मालमत्तेमध्ये दक्षिण मुंबईतील दिल्ली जायका या हॉटेलचा समावेश असून याठिकाणी १९८०च्या काळात दाऊदचे वास्तव्य होते. काही दिवसांपूर्वी हीच मालमत्ता खरेदी करण्याची बोली लावल्यामुळे पत्रकार एस.बाळकृष्णन यांना दाऊदचा साथीदार छोटा शकील याने धमकी दिली होती. या मालमत्तेची राखीव किंमत १.१८ कोटी रुपये आहे.  तर माटुंग्याच्या महावीर बिल्डिंगमध्ये दाऊदच्या नावे असणाऱ्या घराची राखीव किंमत ५०.४४ लाख इतकी आहे.
दाऊदच्या याच्या सात मालमत्तांचा सक्षम अधिकाऱ्यांच्या मार्फत लिलाव होत असून अमली पदार्थ तस्करी व परकीय चलन कायदा १९७६ अन्वेय ही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यापूर्वी २००१ मध्ये दाऊदच्या ताडदेव येथील औद्योगिक गाळ्याचा लिलाव करण्यात आला होता. मात्र, ही मालमत्ता खरेदी करणाऱ्या श्रीवास्तव यांना अद्यापपर्यंत या जागेचा ताबा मिळालेला नाही. दाऊदची बहीण हसिना पारकरने न्यायालयात धाव घेतल्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.