20 September 2020

News Flash

गणेशभक्तांची खासगी वाहतूकदारांकडून लूट

ऐन सणासुदीत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून बसभाडय़ात वाढ केली जाते.

बसभाडय़ात भरमसाठ वाढ; कोकणातील प्रवासासाठी दोन हजार रुपयांपर्यंत आकारणी

रेल्वे, एसटी फुल झालेल्या असतानाच ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मनमानी कारभार चालवत बसभाडय़ात भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात आणि राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. मुंबईहून रत्नागिरी, सावंतवाडी, गोवापर्यंतच्या वातानुकूलित प्रवासासाठी प्रत्येकी तब्बल १,५०० रुपये ते २,५०० रुपये, तर बिगरवातानुकूलित प्रवासासाठी १००० रुपयांपेक्षा जास्त शुल्क प्रवाशांना मोजावे लागेल. मुंबई ते नागपूर प्रवासही महागला असून, वातानुकूलित स्लीपरचा प्रवास २,६२५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

ऐन सणासुदीत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून बसभाडय़ात वाढ केली जाते. त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. साधारणपणे एक वर्षांपूर्वी या सूचना केल्यानंतरही सरकारकडून त्यावर अद्यापही नियंत्रण ठेवता आले नाही. २५ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. रेल्वे आणि एसटीकडून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा गाडय़ा सोडण्यात आल्या असून, त्याही नेहमीप्रमाणे फुल झाल्या आहेत. त्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत कोकणात आणि राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या बसचे भाडे भरमसाट वाढवले आहे.

मुंबई, ठाणेसह एमएमआर क्षेत्रातून रत्नागिरीला जाण्यासाठी बिगर वातानुकूलित बसचे भाडे १००० रुपये, तर सावंतवाडीसाठी १,२०० रुपये मोजावे लागतील. याच मार्गावर वातानुकूलित स्लीपरचे भाडे हे दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गोवापर्यंत जाण्यासाठी वातानुकूलित स्लीपरचे भाडे २,५०० रुपये आणि बिगरवातानुकूलित स्लीपरचे भाडे दोन हजार रुपयांपर्यंत झाले आहे. याचबरोबर चिपळूण, कणकवली, सोलापूर, नागपूर, औरंगाबादला जाण्यासाठीही हीच परिस्थिती आहे.

ऑनलाइन तिकिट स्वस्त

कोकणात किंवा अन्य मार्गावर बस सेवा देणाऱ्या नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसचे तिकिट ऑनलाइन बुक केल्यास ते सवलतींसह स्वस्तात उपलब्ध होत आहे. गणेशोत्सवात बिगरवातानुकूलित कोकणापर्यंतचे तिकीट ८०० ते १००० रुपयांपर्यंत आणि वातानुकूलित प्रवास तिकिट १,२०० ते १,४०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सणासुदीत तिकिटांचे दर वाढवण्यात तिकिट दलाल आणि छोटे प्रवासी वाहतूकदार कारणीभूत तर नाहीत ना असा संशय येतो. यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, असाही वेगळा सूर उमटत आहे.

रेल्वे, एसटी प्रवास स्वस्तच

  • कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वे फुल झाल्या आहेत, तर जादा गाडय़ांनाही चांगला प्रतिसाद आहे. कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसचे गोवापर्यंतचे २३ आणि २४ ऑगस्टचे सेकंड एसीचे तिकीट १,५४० रुपये आहे, तर फर्स्ट एसीचे तिकीट २,६१० रु., थर्ड एसीचे तिकीट १,०७० आणि स्लीपरचे तिकीट ३९० रुपये आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसचेही फर्स्ट एसी ते थर्ड एसी व तिकीट मांडवीप्रमाणेच आहे. मेंगलोर, जनशताब्दी या ट्रेनचे भाडेही परवडणारेच आहे.
  • एसटीच्या २,२१६ पैकी २,०५० गाडय़ा बुक झाल्या आहेत. एसटीच्या कोकण मार्गावरील बसचे भाडे हे खासगी बसच्या तुलनेत फारच कमी आहे. मुंबई ते रत्नागिरी शिवशाहीचे भाडे ५३७ रुपये आहे, तर रत्नागिरीपर्यंत साध्या बसचे भाडे ४४७ रु. व निमआरामचे भाडे ५१६ रु. आणि मालवणपर्यंत साध्या बसचे ५३६ भाडे रुपये आहे. मुंबई ते औरंगाबाद मार्गावर शिवनेरी बसही धावत असून १,१०० रुपये आहे.

सणासुदीतच ही वाढ केली जाते. यात अनेक कारणे आहेत. सणासुदीत शासनाकडून आम्हाला कोणतीही सवलत दिली जात नाही. त्याचप्रमाणे बस जाताना भरून जातात आणि येताना रिकाम्या येतात. त्यामुळे आम्हाला नुकसानीलाही सामोरे जावे लागते. रस्त्यांची दुरवस्था, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि डिझेलवर होणारा खर्च यामुळे वाढ करावी लागते.

के.व्ही. शेट्टी (मुंबई बस मालक संघटना- अतिरिक्त सचिव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2017 4:07 am

Web Title: ganpati festival 2017 private bus transport fare hike in ganpati festival
Next Stories
1 ‘जीएसटी’चा समावेश नसलेल्या निविदा रद्द
2 गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते भाजपला
3 वंध्यत्वाच्या मुळाशी बदलती जीवनशैली
Just Now!
X