लिची, सुकामेवा, मोतीचूर अशा विविध जिन्नसांचा वापर

बुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणेशासाठी यंदा मिठाई उत्पादकांनी लिची, ब्लॅक करंट, आईस्क्रीम मोदक असे नाना प्रकार बाजारात आणले आहेत.

गणपतींच्या आगमनाबरोबर बाजारात मिठाईचे नवनवीन प्रकार येण्यास सुरुवात होते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. पारंपरिक उकडीच्या मोदकापासून ते मावा मोदक, चॉकलेट, लिची मोदकांनी मिठाईची दुकाने सजली आहेत. यावर्षी जवळपास सर्वच दुकानांमध्ये चॉकलेटचे विविध प्रकारातील मोदक मोठय़ा संख्येने पाहायला मिळत आहेत. मात्र यंदा बाजारात प्रथमच आईस्क्रीमचा उकडीचा मोदक आला आहे. काजूचा स्वाद आणि तोंडात घेताच विरघळणारा गूळ यामुळे याचा प्रत्येक घास आनंद देणारा ठरतो. पारंपरिक पद्धतीप्रमाणे, मोदकाचे टोक तोडून त्यात तुपाची धार सोडून मग तो खाल्ला जातो. त्याचप्रमाणे, या आईस्क्रीमवर गुळाचा सॉस ओतण्यात येतो. आईस्टसीने हा आईस्क्रीम मोदक बाजारात आणला आहे.

याशिवाय मलई मोदक, काजू मोदक, खोपरा मोदक, मोतिचूर मोदक, अंजीर मोदक असे नानाविध प्रकारच्या मोदकांनी दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे फळांच्या विविध चवीचे मोदकही बाजारात उपलब्ध आहेत. सुकामेव्यापासून बनविलेले मोदक यावर्षी मोठय़ा प्रमाणात बनविल्याचे विविध दुकानांमध्ये दिसत आहे. त्यामध्ये क्रंची बदाम मोदक, ड्रायफ्रुट काजू मोदक, खजूर मोदक आदींचा समावेश आहे.

गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवायला मोठे मोदकही अशा वेगवेगळ्या चवींत उपलब्ध आहेत. तसेच ऑर्डरप्रमाणे गणपती समोर ठेवायला खास मोदक बनवून देण्यात येत आहेत. कुलाब्यातील ब्रिजवासी स्वीट्सने तीन रंगातील तिरंगा मोदक बनविले असून ते यावर्षीचे प्रमुख आकर्षण आहे. त्याचबरोबर त्यांनी राजस्थानी पद्धतीने बनविलेला चिरावा मोदक, माँगो मलई मोदक, गुलकंद मोदक आदी नवीन मिठाईंचे प्रकार प्रथमच बाजारात आणले आहेत. बोरिवलीतील आकाश स्वीट्स यांनी या वर्षी प्रथमच ब्लॅक करंट मोदक तयार केला असून त्याची तुरटशी अशी विशेष चव आहे.