सार्वजनिक गणेश मंडळांकडून आधुनिक सुरक्षा उपाययोजना

मुंबई : श्री गणरायाच्या मूर्तीवरील मौल्यवान आभुषणांबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता कार्यकर्त्यांची फौज अपुरी पडू लागल्याने अनेक मोठीच नव्हे तर लहानलहान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही आता सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा आधार घेऊ लागली आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सीसीटीव्हीचे कवच आणखीनच विस्तारल्याचे पाहायला मिळत आहे.

गणपतीच्या मंडपात कार्यकर्ते रात्रभर जागरण करतात. पण मंडप परिसरात अखंड पहारा राहावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा मंडळांना सोयीची वाटते आहे. अनेकदा कार्यकर्त्यांना दहा दिवस मंडपात तळ ठोकून बसणे शक्य नसते. म्हणून मालाड पश्चिम येथील ‘साई दर्शन मित्र मंडळा’त मंडपातील अनुचित प्रकार टाळण्याकरिता स्वयंसेवक तनात असतात. याशिवाय अकरा दिवस मंडप आणि रस्ते सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली ठेवले आहेत. मंडपात अग्निशमन यंत्रणेची सोय आहे. ‘आमचा सोहळा निर्वघ्निपणे पार पडावा यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने दरवर्षी एक एक पाऊल टाकत असतो,’ असे मंडळाचे व्यवस्थापक मोंटू रुइया यांनी सांगितले. मंडळाच्या मिरवणुकीतही वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असतात.

कांदिवलीतील ‘वडार समाज मित्र मंडळा’ने यंदाचे पन्नासावे वर्ष असल्याने यावर्षी सुरक्षिततेचीे खास काळजी घेतली आहे. सीसीटीव्ही सोबतच यंदा २४ तास सुरक्षारक्षक मंडपात तनात करण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीतही गैरप्रकार टाळण्याकरिता सुरक्षारक्षकांची तुकडी कार्यरत असेल, असे मंडळाचे सदस्य राकेश आकुंटे यांनी सांगितले. विलेपाल्र्याचे गणराज मंडळ सुरक्षेसाठी इतर खर्चाना कात्री लावते, अशी माहिती मंडळाचे सदस्य जिग्नेश पटेल यांनी दिली. या मंडळानेही एका खासगी कंपनीच्या मदतीने मंडप परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणला आहे.

वडाळ्याच्या राजा गणेश उत्सव मंडळाने तर यावर्षी रफी अहमद किडवाई पोलीस ठाण्याच्या मदतीने पूर्ण वडाळा विभागात कायमस्वरूपी २२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यातील ५० कॅमेरे या वर्षी बसविण्यात आले आहेत. केवळ गणेश मंडळांवर नाही तर आसपासच्या इतर स्थळांवर देखील करडी नजर ठेवली जात आहे. या प्रकल्पासाठी मंडळाने एकूण दोन कोटी रुपये खर्च केले असून हा संपूर्ण निधी लोकवर्गणीतून उभा केल्याचे मंडळाचे अध्यक्ष जयंत पटेल यांनी सांगितले.

वडाळ्याच्या राम मंदिरामधील प्रसिद्ध ‘जीएसबी सेवा मंडळा’च्या मंडपातही ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तर सेवा मंडळाच्या किंग सर्कलमधील मंडपात ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. सोने आणि चादींच्या दागिन्यांनी आभूषित असणाऱ्या जीएसबी सेवा मंडळाच्या या गणेशमूर्तीवर मंडळाकडून नेमण्यात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांचीही नजर आहे. राम मंदिरात १६ खासगी सुरक्षा रक्षक नेमले असून, गणेश मूर्ती सोन्याने आभूषित असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही पुजाऱ्यांशिवाय कोणालाही मूर्तीपर्यत जाऊ देत नाही, अशी माहिती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष उल्लास कामत यांनी दिली. किंग सर्कल येथील गणेश मूर्ती ही एसएनडीटी महाविद्यालयाच्या विस्तृत मैदानात बसविली जात असल्याने मंडळाने ड्रोन कॅमेरांची मदत घेतली आहे.