झूम, गूगल मीट यांद्वारे आयोजन; गरबा शिकवणी वर्गाना प्रतिसाद कमी

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे राज्य सरकारने यंदा गरबा, दांडिया आयोजित करण्यास मनाई केल्याने गरबा शिकवणाऱ्या वर्गाना थंड प्रतिसाद आहे. त्यामुळे क्लासचालक गरब्यासोबतच जॅझ, कंटेम्पररी, बॉलीवूड, वेस्टर्न हे नृत्यप्रकार शिकवून व्यवसाय तगवण्याच्या तर आयोजक ऑनलाइन गरबा भरविण्याच्या प्रयत्नात आहेत.

दहिसर येथे नृत्याचे शिकवणी वर्ग आयोजित करणारा सतीश जाधव नवरात्रीत ऑनलाइन गरबा आयोजित करण्याचा विचार करत आहे. ‘आम्ही नुकतेच याची रंगीत तालीम केली. यातील सहभागी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गच्ची अथवा मोकळ्या जागेत गरबा करून पाहिला. मात्र इंटरनेटचा कमी वेग आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होणे यामुळे ऑनलाइन गरबा आयोजित करण्यास अडचणी येत आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

एका इव्हेंट कंपनीत काम करणारे नंदकुमार पाटील गेली पाच वर्षे बोरिवली, मालाड, गोरेगाव परिसरात गरबा आयोजित करत आहेत. दोन महिन्यांपासून आमच्या तयारीस सुरुवात होते. केटर्स, वेशभूषा, कलाकार, टॅटू काढणारे, प्रकाशयोजना, रंगभूषा करणारे अशा पन्नास ते शंभर लोकांना यामुळे रोजगार मिळतो. यंदा फक्त दोन बडय़ा गुजराती कुटुंबाने ऑनलाइन गरबा आयोजित करण्यासाठी विचारणा केली. झूम, गूगल मीट यांद्वारे गरबा आयोजित करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

नृत्यदिग्दर्शक असलेला कौस्तुभ जोशी नाशिकमध्ये ‘रासलीला गरबा वर्कशॉप’ नावाने कार्यशाळा घेतो. यंदाचे हे चौथे वर्ष असून, तो महिला, मुलांना ऑनलाइन नृत्याचे धडे देत आहे. साधारण सप्टेंबरपासून कार्यशाळेस सुरुवात होते. या एक महिन्याच्या कालावधीत एक हजार लोक सहभागी होतात. या काळात आमची दीड ते दोन लाख रुपये एवढी कमाई होते. यंदा करोनामुळे त्यावर पाणी पडल्याचे त्याने सांगितले. आमची कार्यशाळा व्यायामशाळेत असल्याने तेथे जास्त लोकांना जमण्यास मनाई आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नृत्याचे शिकवणी वर्ग आणि ऑनलाइन गरबा आयोजित करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सकारात्मकतेसाठी नृत्य

दोन मैत्रिंणींनी मला गरबा शिकविण्याबाबत विचारणा के ली. त्यांना गरबा शिकून समाजमाध्यमावर चित्रफिती टाकायच्या आहेत. नृत्यामुळे करोनाच्या नैराश्यमय परिस्थितीत सकारात्मकता निर्माण करण्यासाठी तरुणी नृत्य शिकत असल्याचे नृत्यदिग्दर्शक धनश्री ढोमसे यांनी सांगितले.

गरब्यांचे प्रकार

गरब्याकरिता महिनाभर आधीच सराव सुरू होतो. दोन टाळी, तीन टाळी, चार टाळी, छकडी, तोडियो, पाश्चिमात्य तोडियो, एकल तोडियो हे गरब्याचे प्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. याचबरोबर दहा, बारा, सोळा, अठरा, एकवीस, सव्वीस आणि अठ्ठावीस स्टेप्सचा गरबा जास्त करून खेळला जातो. ‘चोगाडा’, ‘सोनल गरबो शिरे’, ‘गोलियों की रासलीला रामलीला’ चित्रपटातील ‘नगाडे संग ढोल बाजे’, ‘रईस’ चित्रपटातील ‘उडी उडी जाए’, ‘काय पो छे’ मधील ‘शुभारंभ’ ही गाणी लोकप्रिय आहेत.