नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या शिकवणी वर्गाची चलती; नवीन नृत्य प्रकारांचा समावेश

अवघ्या दोन टाळ्यांवर रंगणाऱ्या गुजरातच्या पारंपरिक गरब्यात ‘जॅझ’, ‘सांबा’, ‘बॅले’सारख्या पाश्चात्त्य नृत्यप्रकारांचे रंग भरत अधिक तो रंगीबेरंगी करणाऱ्या क्लासेसची नवरात्र जवळ आली तशी चलती सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर ‘फिटनेस गरब्या’च्या नावाखाली गरब्यातून व्यायाम कसा करावा, याचेही प्रशिक्षण देणाऱ्या क्लबना धंदा मिळतो आहे. अवघ्या दोन दिवसांकरिता १००० ते १२०० रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या या क्लासेसमुळे गरब्यात अधिक रंग भरला जात आहे.

खरे तर गरब्यात दोन टाळी, प्रोग्रेसिव्ह, पारंपरिक असे तीन टप्पे असतात. नृत्यात फारसा पारंगत नसलेल्यांचे दोन टाळीवर भागते, परंतु गरब्याची नजाकत वाढविण्याकरिता ‘प्रोग्रेसिव्ह’ प्रकारालाही तरुणतरुणींकडून पसंती मिळते आहे. त्यातच गरब्याच्या पारंपरिक प्रकाराशी चिकटून राहणाऱ्यांकरिता वेगळा पर्यायही क्लासचालक उपलब्ध करून देत आहेत.

नवरात्रोत्सवापूर्वीच बोरिवली, मालाड, विलेपार्ले, मुलुंड आदी गुजरातीबहुल भागांत गरब्याची धूम सुरू होते. विलेपार्लेतील ‘ओमकार डान्स’ या संस्थेच्या नीतिज्ञा जानी गेल्या २५ वर्षांपासून गरबा शिकवीत आहेत. तासन्तास गरबा खेळताना संगीतात आणि नृत्याच्या प्रकारात विविधता आणण्याकरिता बॉलीवूडमधील गाजलेल्या हिंदी गाण्यांमधील नृत्याच्या ‘स्टेप्स’ (नृत्याविष्कार) आम्ही शिकवितो, असे        जानी यांनी सांगितले. यंदा ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘नगाडे संग ढोल बाजे’, ‘शहनाई’ या गाण्यांमधील नृत्यांच्या स्टेप्सचा प्रामुख्याने समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर जानी यांच्याकडे गरबा शिकण्यासाठी नृत्यप्रेमी येतात. मात्र नवरात्रोत्सवात विशेष १५ दिवसांच्या बॅचपासून अवघ्या दोन दिवसांच्या बॅचमध्ये त्या शिकवितात. यासाठी सुमारे १ ते ३ हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते.

फिटनेस गरबा

या काळात फिटनेस क्लबनाही धंदा मिळतो. ‘आयबॉल’ या असाच क्लबने दोन दिवसांची कार्यशाळा घेऊन नेहमीच्या दोन टाळींव्यतिरिक्त चित्रपटांच्या गाण्यांवर गरबा शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विशेष ‘बॉली गरबा’ प्रकारामुळे गरबा खेळण्याबरोबरच व्यायामही होतो आणि मन आनंदी राहते, असा नृत्यदिग्दर्शक अश्मक सय्यद यांचा दावा आहे. दोन दिवसांतील चार तासांच्या या कार्यशाळेसाठी १२००-१५०० रुपये आकारले जातात.

पारंपरिक गरबा शिकविण्यासाठी अनेक नृत्यदिग्दर्शक आग्रही असल्याचे पाहायला मिळते. मालाड येथील ‘सोनीज स्कूल’ या क्लासेसमधील जिगर सोनी गेली १८ वर्षे पारंपरिक गरबा शिकवीत आहेत. गरबा हे लोकनृत्य असून फक्त नवरात्रोत्सवातच नाही तर वर्षभर शिकण्याची कला आहे, असे सोनी यांचे म्हणणे आहे.

परदेशात गरब्याला मागणी

लंडन, अमेरिका, स्वित्र्झलड, इराण, श्रीलंका या देशांमध्ये गरबा शिकविण्यासाठी मागणी वाढत आहे. जिगर सोनी गेली अनेक वर्षे परदेशात जाऊन गरबा शिकवीत आहे. येथे बॉलीवूड किंवा फ्युजनपेक्षा पारंपरिक गरबा शिकण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे, असे सोनी यांनी सांगितले.

आजी-आजोबांचे वर्ग

तरुणांबरोबरच आजी-आजोबाही गरबा शिकण्यासाठी क्लासेसला हजेरी लावत आहे. विलेपार्लेच्या नीतिज्ञा जानी यांच्याकडे ६५ वयापुढील आजी-आजोबांची १५ दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. शरीर थकले असले तरी त्यांच उत्साह जबरदस्त असतो, असे नीतिज्ञा यांनी सांगितले.