ओल्या कचऱ्यापासून घरीच खतनिर्मितीसाठी मुंबईकरांना प्रोत्साहन

वाढता कचरा, त्यातून क्षमता संपुष्टात आलेली कचराभूमी, त्यामुळे न्यायालयाने नव्या विकासकामांवर घातलेली बंदी हा विषय पालिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. त्यामुळे मोठय़ा गृहनिर्माण संस्थांना ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. परंतु सक्ती केल्यानंतरही पालिकेची ही योजना यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे. मुंबईकरांना घरीच ओल्या कचऱ्यापासून सहजगत्या खत निर्मिती करता यावी म्हणून आता कचरा वेचकांनीही पुढाकार घेतला आहे. कचरा वेचकांनी तयार केलेली ‘जादूची खत टोपली’ घरोघरी पोहोचू लागली असून सोसायटीऐवजी घराघरातच कचऱ्याची विल्हेवाट लागण्यास चालना मिळू लागली आहे.

गेली अनेक वर्षे कचराभूमीत अथवा नित्यनियमाने कचरा साठवून ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी कचरा वेचून मिळणाऱ्या वस्तूंची विक्री करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचकांची संख्या मोठी आहे. देवनार कचराभूमीमध्ये लागलेल्या आगीनंतर कचरा वेचकांना तेथे प्रवेशबंदी करण्यात आली. शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या मुंबईला या स्पर्धामध्ये आघाडीचे स्थान मिळावे म्हणून पालिकेने धडपड सुरू केली आहे. मात्र मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुंबईमध्ये दररोज ७,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. क्षमता संपुष्टात आलेल्या देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीतच तो टाकला जात आहे. त्यामुळे मोठय़ा सोसायटय़ांना ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र पालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही सोसायटय़ा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत.

काही समाजसेवकांनी एकत्र येऊन कचरा वेचकांची ‘सावित्रीबाई फुले घनकचरा व्यवस्थापन सहकारी संस्था’ स्थापन केली. ही संस्था स्त्री मुक्ती संघटनेशी संलग्न आहे. या संस्थेने घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ‘जादूची खत टोपली’ तयार केली आहे. एका कुटुंबाचा कचरा एका टोपलीमध्ये सामावून घेतला जातो आणि त्यापासून नैसर्गिक पद्धतीने खत निर्मिती केली जाते. संस्थेकडून या टोपलीसोबत ‘जिवाणू विरजण’ दिले जाते. दररोज घरामध्ये एका कुटुंबाचा साधारण अर्धा ते पाऊण किलो ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचऱ्याचा चोथा, भाजीचा नको असलेला भाग बारीक करून या टोपलीमध्ये टाकायचा आणि काठीच्या साहाय्याने तो ‘जिवाणू विरजणा’मध्ये मिसळावा लागतो. दररोज निर्माण होणारा कचरा या टोपलीमध्ये टाकल्यानंतर विरजणातील जिवाणूंमुळे प्रक्रिया सुरू होते.

या प्रक्रियेतून २५ ते ३० दिवसांमध्ये त्यापासून खत तयार होते. या टोपलीत तयार झालेले खत (काळा भाग) २५ ते ३० दिवसांनी काढून ते वाळवून किंवा थेट झाडाच्या बुंध्याशी टाकता येतो. या संस्थेने गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन हजार ‘जादूच्या खत टोपल्यां’ची विक्री केली असून कचरा वेचकांच्या प्रयोगशाळेत तयार झालेल्या टोपलीमध्ये आजघडीला दोन हजार कुटुंबे घरातच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करू लागले आहेत.

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरने ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत ‘रुजवा संस्कृती स्वच्छते’ची हा उपक्रम हाती घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेचे सर्व सभासद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कचरा वेचकांनी तयार केलेली ‘जादूची खत टोपली’ भेट दिली आहे. तब्बल २७० जणांना ही टोपली देण्यात आली असून कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेने  वाटा उचलला आहे.