‘बेस्ट’च्या बसगाडीतून पालिकेचे खतनिर्मितीचे धडे

मुंबईतील मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा, हॉटेल्स, मॉल्स आदींना बंधनकारक केलेल्या खतनिर्मितीचा प्रचार, प्रसार आणि मार्गदर्शनासाठी पालिकेने ‘बेस्ट’च्या बसगाडीचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करावी याचे प्रदर्शन बेस्ट बसमध्ये मांडण्यात येणार असून हे प्रदर्शन घेऊन ही बस शाळा, सोसायटय़ांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे खतनिर्मिती कशी करावी याबाबतची माहिती मिळविण्यासाठी रहिवाशांना आणि विद्यार्थ्यांना पालिकेच्या विभाग कार्यालयात खेटे घालण्याची गरज भासणार नाही.

मुंबईमधील २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच दर दिवशी १०० किलो कचरा निर्माण होत असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांना कचऱ्याच्या विल्हेवाटीची यंत्रणा उभारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत अनेक सोसायटय़ांनी कचऱ्यापासून खतनिर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या काही विभाग कार्यालयांमध्ये प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात खतनिर्मितीची प्रक्रिया, प्रकल्पाचा खर्च, आवश्यक जागा याबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु या प्रदर्शनास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पालिकेने हे प्रदर्शनच सोसायटय़ांच्या दाराशी नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘बेस्ट’ची मदत घेण्यात येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसगाडीमध्ये खतनिर्मितीचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून ही बसगाडी सोसायटय़ा आणि पालिका शाळांमध्ये पोहोचणार आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाच्या स्वतंत्र तीन बसगाडय़ांमध्ये खतनिर्मितीचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. ही बस त्या त्या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रहिवाशी आणि शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी करावी याची माहिती रहिवाशांना सोसायटीतच आणि विद्यार्थ्यांना शाळेतच मिळू शकणार आहे. खासगी शाळाच्या व्यवस्थापनाने उत्सुकता दर्शविल्यास ही बस त्या शाळेत दाखल होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांना कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे महत्त्व पटवून देता येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

धकाधकीच्या जीवनात अनेकांना पालिकेच्या विभाग कार्यालयात जाऊन खतनिर्मिती संदर्भातील प्रदर्शन पाहता येत नाही. शाळकरी विद्यार्थ्यांना खास गाडीने येथे घेऊन यावे लागते. त्यामुळे बेस्ट बसगाडीतच प्रदर्शन उभारून ती गृहनिर्माण सोसायटय़ा आणि शाळांमध्ये घेऊन जाण्याचा विचार आहे. या फिरत्या प्रदर्शनामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याच्या योजनेचा प्रचार, प्रसार आणि मार्गदर्शन असा तिहेरी हेतू साध्य करता येऊ शकेल.

अजोय मेहता, पालिका आयुक्त