महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर, शिवाजी पार्क परिसरातील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर पालिकेने चैत्यभूमी आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवून तब्बल ७० टन कचरा उचलला.

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे अनुयायी येत असतात. यंदा त्याच दरम्यान ओखी चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसला. मुंबईमध्ये पडलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानाची दुर्दशा झाली. मात्र तरीही मोठय़ा संख्येने डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून अनुयायी ६ डिसेंबर रोजी रात्री माघारी परतू लागले. त्यानंतर पालिकेने रात्री ११ वाजता या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. ही स्वच्छता मोहीम दोन साहाय्यक अभियंता, दोन दुय्यम अभियंता, दोन साहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पालिकेचे २५ मुकादम, १५०० कामगारांनी या भागाची स्वच्छता केली. एकूण ७० मेट्रीक टन कचरा या परिसरातून गोळा करण्यात आला आणि १४ वाहनांमधून तो कचराभूमीत नेण्यात आला. रस्त्याची स्वच्छता करण्यासाठी सहा टँकर पाण्याचा वापरही करण्यात आला. त्याचबरोबर सात किसेस सेंटेड फिनॉइल, २०० किलो र्निजतुक पावडर, १०० किलो ३३ टक्के टीसीएल आदींचा वापर करण्यात आला. रात्रभर सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी १५०० रिप्लेक्टिंग जॅकेट, १२० टी शर्ट, ७०० जोड हातमोजे, १५०० मास्क, २५० झाडू, ३० ब्रश, १५० हॅण्ड बॅरोज, २२० व्हील बिनचा वापर करण्यात आला. गुरुवारी रात्री ११ वाजता हाती घेतलेली स्वच्छता मोहीम शुक्रवारी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती.