स्वयंसेवी संस्थेकडून पाच हजार किलो कचऱ्याचा उपसा; मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण अधिक

निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवार, रविवारी किंवा सुटीच्या दिवशी मुंबईनजीकच्या ठाणे, रायगड जिल्ह्य़ांतील नैसर्गिक पर्यटनस्थळांकडे धाव घेणारे पर्यटकच या निसर्गाच्या मुळाशी उठले आहेत. ‘एन्व्हायर्नमेन्ट लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने जुलै महिन्यात अशा पर्यटनस्थळांवरून तब्बल पाच हजार किलो वजनाचा कचरा गोळा केला. यामध्ये मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण भरपूर असून धबधब्यांच्या ठिकाणी मद्यप्राशनाला आळा घालण्यात अद्याप पोलिसांना यश न मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत कर्जत, कल्याण, खोपोली जवळच्या धबधबे, नद्या अशा पर्यटनस्थळी जाण्याला अनेकजण पसंती देतात. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी अशा वर्षांसहली आयोजित करतात. परंतु निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक याठिकाणी कचरा करून निसर्गाचे नुकसान करत असल्याचे समोर येत आहे. पर्यटकांकडून याठिकाणी मद्यप्राशन केले जात असल्याने दारूच्या बाटल्या, शिवाय याचठिकाणी भोजनाचा बेत होत असल्याने पेपरप्लेट किंवा थर्माकोल डिश, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या टाकून पर्यटक परतीच्या प्रवासाला निघतात. या गोष्टी अविघटनशील असल्याने त्या याठिकाणी साचून राहतात. जुलै महिन्यात ‘एन्व्हायर्नमेन्ट लाइफ’ या संस्थेतर्फे मुंबईनजीक असलेल्या आठ धबधब्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेअंती पाच हजार किलो कचऱ्याचे संकलन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या कचऱ्यात प्रामुख्याने दारूच्या बाटल्यांचे प्रमाण जास्त असून थर्माकोल डिश यासोबत पर्यटकांनी फेकून दिलेल्या कपडय़ांचाही समावेश आहे.

भिवपुरी धबधबा येथून सर्वाधिक अडीच हजार किलो कचऱ्याचा उपसा करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कोंडेश्वर येथून १००० किलो, आनंदवाडी ५४० किलो, जुमापट्टी १२० किलो, टपालवाडी १२० किलो, चिंचोटी २२० किलो, झेनिथ २२०, पांडवकडा २८० किलो कचऱ्याचा उपसा संस्थेच्या स्वयंसेवकांनी केला आहे.

संस्थेच्या एकूण पाच हजार स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. मुंबई नजीक असलेल्या धबधब्यांची अवस्था बिकट असून त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत संस्थेचे धर्मेश बरई यांनी मांडले. याशिवाय याठिकाणांना भेट देण्यासाठी जर शुल्क आकारण्यात आले तर त्यांचा फायदा पर्यटन विकासाकरिता होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यवाहीच्या सूचना

या अस्वच्छतेला चाप बसण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहेत. धबधबा क्षेत्रात दारूबंदी करणे, त्याठिकाणी कचराकुंडय़ा लावणे, कपडे बदलण्यासाठी आवश्यक कक्षाची आणि शौचालये तयार करणे, धबधब्यांची माहिती देणारे फलक लावणे यांसारख्या सूचना संस्थेतर्फे  पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आल्या होत्या. या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत महामंडळाने  जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबत पत्र पाठविले आहे.