|| प्रसाद रावकर

प्रदूषण, आरोग्याच्या समस्येत वाढ ; केवळ १२ हेक्टर जागा पालिकेला हस्तांतरित:- मुंबईकरांचा कचरा पोटात सामावून घेणाऱ्या देवनार, कांजूर कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली असली तरीही आज तेथेच कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे कचराभूमींच्या आसपासच्या परिसरातील प्रदूषण प्रश्न ‘जैसे थे’च असून आरोग्याच्या प्रश्नांमुळे रहिवासीही हैराण झाले आहेत. या कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात पालिकाही अपयशी ठरत असून मुंबईकरांच्या कचऱ्यासाठी पालिकेला जागा देण्यातही राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

गेली अनेक वर्षे मुंबईकरांचा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमींमध्ये टाकण्यात येत आहे. या तिन्ही कचराभूमींची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. ही बाब लक्षात घेत पालिकेने मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे आजघडीला दररोज देवनारमध्ये १५०० मेट्रिक टन आणि कांजूरमध्ये ५५०० मेट्रिक टन कचरा टाकण्यात येत आहे. या दोन्ही कचराभूमींमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असून आरोग्याच्या प्रश्नामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.

मुंबईकरांचा कचरा टाकण्यासाठी पालिकेने अंबरनाथ येथील करवले आणि ऐरोली येथे जागा देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती. मात्र ऐरोली येथील स्थानिक रहिवाशांनी विरोध केला असून करवले येथील ५२ हेक्टरपैकी केवळ १२ हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. पालिकेला देण्यात येणाऱ्या करवले येथील ५२ हेक्टर जागेत सुमारे ७३ रहिवासी वास्तव्य करीत आहेत. या संपूर्ण परिसरात विखुरलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आली आहे. जोपर्यंत या सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येत नाही, तोपर्यंत तेथे कचराभूमी उभारणे पालिकेला शक्य नाही.

मुंबईतील क्षमता संपुष्टात आलेल्या कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुलुंड कचराभूमीत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, सिमेंट कारखान्यांना इंधन म्हणून विशिष्ट कचरा (खाद्यपदार्थाचे वेस्टन आदी) पुरवून कचराभूमीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. प्रक्रिया होऊ न शकणारा उर्वरित कचरा करवले येथील कचराभूमीत टाकण्याचा पालिकेचा मानस आहे. तथापि, संपूर्ण जमीन ताब्यात येईपर्यंत पालिकेला तेथे कचराभूमी उभारणे अशक्य बनले आहे.

देवनार कचराभूमीतील ५० हेक्टर जागेवर कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार हे गुलदस्त्यातच आहे. मात्र कचराभूमीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियाच करण्यात येत नसल्यामुळे तुलनेत आरोग्याच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली असून या भागातील रहिवासी बेहाल झाले आहेत. – राजकुमार शर्मा, सामाजिक कार्यकर्ता