समीर कर्णुक

चेंबूरमधील रहिवाशाचा उपक्रम; प्रेरणा घेऊन अन्य गृहसंकुलांतही सुरुवात

नाल्यांमधून काढलेल्या गाळाचे ‘लोणी’ कंत्राटदार कसे मटकावतात याचा प्रत्यय नालेसफाई घोटाळ्यातून आला असताना चेंबूरमधील एका गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशाने गटारातून काढलेल्या गाळातून सेंद्रिय भाज्या आणि फळे-फुलांची बाग फुलविली आहे. नाल्यातील गाळावर फुललेल्या या मळ्यापासून प्रेरणा घेत चेंबूरमधील अनेक गृहनिर्माण संस्थाही आपल्या परिसरात गाळ्याच्या वापरातून उद्यान फुलवू लागल्या आहेत.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील गीत-गोविंद गृहनिर्माण संस्थेत राहणारे संजू काळे हे गेल्या दहा वर्षांपासून अशाप्रकारे संस्थेच्या आवारात बाग फुलवीत आहेत. पहिल्यांदा त्यांनी त्यांच्याच इमारतीमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली. तयार होणारे खत ते आपल्या इमारतीतील झाडांना पुरवत होते. मात्र ही खतनिर्मिती काही प्रमाणात खर्चीक होत असल्याने ते गेल्या काही वर्षांपासून नाल्यांमधून काढण्यात येणाऱ्या गाळाच्या आधारे तयार केलेल्या खताचा वापर झाडांसाठी करत आहेत.

पावसाळा सुरू होताच पालिकेकडून नाल्यांची साफसफाई सुरू होते. यातून मोठय़ा प्रमाणात गाळ आणि घाण काढली जाते. त्यानंतर ही सर्व घाण आणि गाळ पालिका फेकून देते. मात्र काळे आपल्या परिसरात जमा होणारा हा गाळ उचलून आपल्या निवासी इमारतीच्या परिसरात जमा करतात. यात चांगल्या प्रतीची माती व खत मिसळून ते मिश्रण फळ, फुळे, भाज्यांच्या झाडांकरिता वापरतात.

सध्या काळे राहत असलेल्या इमारतीच्या आवारात ५० ते ६० प्रकारची फुले आणि भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे. त्यांच्या इमारतींमधील अनेक रहिवासी त्याचा लाभ घेत आहेत. कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा मारा या भाज्या आणि फळांवर केला जात नाही. काळे यांच्या कामापासून प्रेरणा घेत टिळक नगरमधील सात सोसायटय़ा आणि घाटकोपरमधील एका समाज मंदिरात काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बगीचा फुलवण्यात आला आहे.

नाल्यांमधून काढलेल्या गाळाची विल्हेवाट कुठे लावायची असा प्रश्न पालिकेसमोर असतो. या गाळाचा काही भाग उद्याने, बगीचे यांच्यासाठी वापरल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल.

-संजू काळे, नागरिक