News Flash

दादरच्या पुलाखाली उद्यान, जॉगिंग ट्रॅक

दादर शंकरशेठ उड्डाणपुलाखाली अशा प्रकारचे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे.

महेश्वरी उद्यानाच्या पुढील भागात नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली उद्यानाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

पुढील वर्षी बांधकामास सुरुवात

मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभित करण्याचा हेतूने गेल्या वर्षी माटुंग्याच्या नानालाल डी. मेहता उड्डाणपुलाखाली महापालिकेतर्फे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक  उभारण्यात आला होता.  याला मिळणारा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहता दादरच्या नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखालीही अशाच प्रकारचे उद्यान बांधण्याच्या तयारीत पालिका आहे. नव्या वर्षांत या उद्यानाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून दादर, वडाळा, नायगाव परिसरांतील रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. शिवाय या प्रकल्पाचा भाग म्हणून महेश्वरी उद्यानाच्या पुढील भागात मेहता पुलाखालीच उद्यान आणि ट्रॅक उभारणीचे काम प्रगतिपथावर असून नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच याचे लोकार्पण होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील महेश्वरी उद्यानाच्या अलीकडे नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली पालिकेने पाच कोटी रुपये खर्चून गेल्या वर्षी उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक बांधले होते. सुमारे ६०० मीटर लांब व १२ मीटर रुंद अशा एकूण ७२०० चौरस मीटर क्षेत्रफळ आकाराच्या जागेवर ‘नर्मदा नदी मार्गक्रमण’ ही संकल्पना साकारून उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.

यामध्ये जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था, योग अभ्यासाकरता जागा, समूह बैठक व्यवस्था अशा सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उड्डाणपुलाखालील जागेवर अशा प्रकारचे उद्यान बांधण्याचा मुंबईतील हा पहिलाच प्रयोग होता. मागील एका वर्षांत या उद्यानाचा वापर स्थानिक रहिवाशी मोठय़ा प्रमाणात करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत ‘एफ-उत्तर’ विभागात येणाऱ्या उड्डाणपुलाखाली उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा निर्णय पालिकेच्या ‘एफ-उत्तर’ विभागाने घेतला आहे.

यासाठी दादर शंकरशेठ उड्डाणपुलाखाली अशा प्रकारचे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्यात येणार आहे. या पुलाखाली आसऱ्याला असणाऱ्या गर्दुल्ले आणि घाणीमुळे दादर टीटी परिसरातील रहिवाशांनी पुलाखाली उद्यान बांधण्याची मागणी केली होती. या मागणीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर नव्याने निवडून आलेले स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांच्या पाठपुराव्यानंतर येणाऱ्या नव्या वर्षांत या पुलाखाली उद्यानाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. यासाठी उड्डाणपुलांखाली असलेले वाहनतळ बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून पालिकेने शंकरशेठ पुलाखालील वाहनतळही हटविले आहे.

पाच उद्यानाबरोबरीनेच इतरही मोठी उद्याने एफ-उत्तर विभागात असली तरी माटुंगाच्या उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या उद्यान आणि जॉगिंग ट्रॅकला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या विभागात असणाऱ्या उड्डाणपुलाखाली अशाच प्रकारची उद्याने बांधण्यात येणार आहेत. दादरच्या नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखाली बांधण्यात येणाऱ्या उद्यानाचे बांधकाम साधारण एप्रिल महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

केशव उबाळे, साहाय्यक आयुक्त, एफ-उत्तर विभाग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:37 am

Web Title: garden jogging track under the dadar bridge
Next Stories
1 फलाट-लोकल गाडय़ांमधील पोकळी भरणार
2 प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रोचे अ‍ॅप
3 ‘सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा’
Just Now!
X