सदोष व्हॉल्व्ह पिनमुळे अपघात झाल्याचा ठपका; ‘एचपीसीएल’ कंपनीला ग्राहक आयोगाचा तडाखा

कल्याण येथे २००७ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. सदोष व्हॉल्व्ह पिनमुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत या अपघातासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) जबाबदार असल्याचा निकाल राज्य ग्राहक आयोगाने दिला आहे. तसेच या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या दोन मुलांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने कंपनीला दिले.

व्हॉल्व्ह पिन ही सदोषच होती आणि अशी सदोष पिन असलेला एलपीजी गॅस सिलिंडरधारकाला देऊन कंपनीने निकृष्ट सेवा दिली आहे. त्यामुळेच या अपघाताला कंपनी पूर्णपणे जबाबदार असल्याचे राज्य ग्राहक आयोगाने निकालात म्हटले आहे.

भारती निमसे या पतीच्या निधनानंतर वर्षां आणि नीलेश ही दोन मुले आणि आईसोबत राहत होत्या. अपघात झाला त्या वेळी वर्षां ही १७, तर नीलेश १३ वर्षांचा होता.  स्फोट झाला त्या दिवशी म्हणजेच ६ एप्रिल २००७ रोजी भारती या शेगडीला नवीन गॅस सिलिंडर जोडत असताना भरलेल्या सिलिंडरमधून गॅसगळती होऊ लागली. हा वायू देव्हाऱ्यातील दिव्याच्या संपर्कात आल्याने स्फोट झाला. निमसे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाने वर्षां आणि नीलेश यांच्यावतीने कंपनीविरोधात जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेत भरपाईची मागणी केली होती.

जिल्हा ग्राहक मंचाने भारती यांच्या मुलांतर्फे करण्यात आलेली तक्रार २०१५ मध्ये योग्य ठरवत त्यांच्या दोन्ही मुलांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते. परंतु कंपनीने या निर्णयाविरोधात २०१६ मध्ये ग्राहक आयोगात अपील दाखल केले. त्यात त्यांनी अपघाताला सर्वस्वी निमसे याच जबाबदार होत्या, असा दावा केला. निमसे यांच्याकडील गॅस हा रबराच्या पाईपने सिलिंडरला जोडलेला होता. परंतु हा पाईप आणि त्याचे रेग्युलेटर हे मान्यताप्राप्त व प्रमाणित नव्हते. त्यामुळेच भरलेल्या सिलिंडरचे झाकण काढताच पूजेच्या दिव्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र कल्याण अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालानुसार, सदोष व्हॉल्व्ह पिन गॅस गळतीसाठी कारणीभूत ठरले. रबरी पाइपद्वारे सिलिंडर गॅसला जोडण्यापूर्वीच गळती झाली आणि स्फोट झाला. या अहवालाच्या आधारे जिल्हा ग्राहक मंचाने दिलेला निकाल योग्य होता, असा निर्वाळा आयोगाने दिला.

आई, शेजारणीला भरपाई नाही

भारती यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई व शेजारी राहणारी एक महिलाही या स्फोटात जखमी झाल्या होत्या. या दोघींच्या कायदेशीर नातेवाईकांनीही कंपनीविरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्या दोघी कंपनीचे ग्राहक नाहीत. त्यामुळे त्यांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत नुकसानभरपाई मागता येणार नाही, असे नमूद करत राज्य ग्राहक आयोगाने त्यांची तक्रार अमान्य केली.