चेंबूर येथील एका चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार, तर १३ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गॅसगळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्घटनेतील मृताचे नाव महेश जगताप असे आहे.
चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील सहदेव चाळीत महेश पत्नी, आई आणि भावासह राहत होते. ते प्राप्तिकर विभागात शिपाई म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या घरावर एक खोली बांधून ती रवींद्र काटे यांना भाडय़ावर दिली होती. ते कुटुंबीयांसमवेत खालच्या खोलीत राहत होते. सोमवारी जगताप यांच्या घरातून गॅसचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांचे दार ठोठवायला सुरुवात केली, परंतु त्याच वेळी सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे वरच्या मजलाही कोसळला. त्यात झोपेत असलेले जगताप आणि काटे कुटुंबीय गाडले गेले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने ढिगाऱ्याखालील अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीररीत्या भाजलेल्या महेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 या दुर्घटनेत जखमी झालेल्या महेश यांच्या आई रुक्मिणी जगताप (६५), पत्नी ज्योत्स्ना आणि भाऊ नितीन तसेच मीना काटे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पौर्णिमा काटे (२०), रवींद्र काटे (१८), काजल काटे (२०) मयूर सकपाळ (२०), कौशल्या आव्हाड, शांताबाई जाधव, प्रियांका शिंदे, देवेंद्र शिंदे या अन्य जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेग्युलेटरमधून गॅसगळती झाल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता टिळकनगर पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्फोटामुळे चाळीतील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले होते.
फोटो गॅलरी : चेंबुरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट