आधुनिक संपर्क माध्यमात विविध प्रकारे नॉस्टेल्जिक होत जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून सध्या बाल दिनानिमित्त फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, बीबीएम, वी-चॅट आदी सोशल साइटस्वर  बहुतेकांनी आपापली बालपणीची छायाचित्रे झळकवली आहेत. त्यामुळे बहुतेकांच्या प्रोफॉइल्सवर ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे चित्र दिसून येते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ली मोठी माणसेही लहान होऊन मुंगी साखरेचा रवा खाऊ लागली आहेत.  
लहानपणीच्या प्रत्येक आठवणी जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडूनच होत असला तरी धावत्या जगात वावरताना त्या आठवणी विस्मृतीच्या कोपऱ्यात हरवून जात असतात. यंदाच्या बाल दिनी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह अनेक शहरांतील हजारो सोशल साइट्सच्या वापरकर्त्यांनी बालपणीचे फोटो शोधून अपलोड करण्याचा सिलसिला सुरू केला होता. हजारोच्या संख्येने तरुणांचे बालपणीचे फोटो या निमित्ताने सोशल साइटवर पाहण्यास मिळाले. फेसबुक, व्हॅट्सअ‍ॅप, ट्विटर्स, बीबीएम, वीचॅट यांसारख्या सोशल माध्यमांनी तरुणांबरोबरच अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होण्याचा मान पटकावला आहे.
सेलिब्रेटींचे बालपण..
दिग्दर्शक रवी जाधव, इंग्रजी कादंबरी लेखक सुदीप नगरकर यांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर फोटो अपलोड केले होते. तर फेसबुकवरच्या काही पेजवर अभिनेता स्वप्निल जोशी, संतोष जुवेकर, नेहा गद्रे, अप्सरा सोनाली कुलकर्णी, केतकी माटेगावकर, ऊर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित या सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटोदेखील मोठा भाव खात होते. तर हिंदी, मराठीतील कलाकार, क्रिकेटर्स यांच्या फोटोंनादेखील सोशल साइटवर मोठी पसंती बाल दिनाच्या निमित्ताने दिसून आली.