मोत्यांपेक्षा खडय़ाच्या अलंकारांना विशेष मागणी

गणपतीचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर आले असताना मोती, हिरे आणि फुलांच्या विविध आकर्षक दागिन्यांनी बाजार नटला आहे. सोनेरी रंगाच्या जानव्यापासून ते सोंडपट्टीपर्यंत अनेक आकर्षक दागिने बाजारामध्ये आले असून ते खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. फक्त मोत्याच्या दागिन्यांपेक्षा या वर्षी खडे आणि सोनेरी मुलाम्याच्या दागिन्यांना बाजारामध्ये विशेष मागणी आहे.

प्लास्टिकला या वर्षी बाजारामध्ये स्थान नसल्याने सॅटन रिबनच्या लाल, गुलाबी, नारिंगी अशा बहुरंगी माळा झळकताना दिसत आहेत. यामध्ये नवलाई आणण्यासाठी मोगऱ्याच्या कळ्या गुंफलेल्या लक्ष वेधून घेणाऱ्या या माळांना बाजारामध्ये विशेष मागणी आहे. अगदी १०० रुपयांपासून ते मोठय़ा लांबीच्या माळा ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दरवर्षी मोत्याच्या कंठय़ा बाजारामध्ये दिसतात. या वर्षी मात्र हिरे, गुलाबी, लाल, हिरव्या रंगांच्या खडय़ांच्या आकर्षक कंठय़ांनी बाजार नटला आहे. मोत्यांसोबतच विविधरंगी खडय़ांच्या कंठय़ा अवघ्या शंभर रुपयांपासून उपलब्ध असल्याने लोकही याच कंठय़ांची मागणी अधिक करत आहेत. गणपती आणि गौरी अशा दोन्ही मूर्तीना या कंठय़ा शोभून दिसणाऱ्या असणाऱ्या असल्यानेही यांना विशेष मागणी आहे. काही लोक आवर्जून गौरी आणि गणपतीच्या मूर्तीसाठी मॅचिंग रंगांच्या खडय़ांच्या कंठय़ा घेऊन जातात. या वर्षी गणपतीच्या मुकुटांमध्येही नावीन्य आले असून या कंठय़ांना साजेसे असे मोती आणि खडय़ांच्या स्वरूपात आलेले आहेत. हेही गौरी आणि गणपती असे दोन्ही मूर्तीना शोभून दिसणारे आहेत. त्यामुळे खडय़ा आणि मोत्यांच्या दागिन्यांना विशेष मागणी असल्याचे दादरच्या विक्रेत्या वृषाली नरुले यांनी सांगितले.

गणपतीसाठी म्हणून खास या वर्षी सोनेरी मुलाम्याच्या दागिन्यांची बाजारामध्ये विशेष रेलचेल आहे. केवडय़ाचे पान, चाफ्याचे- जास्वंदीचे फूल आदी सोनेरी मुलाम्यामध्ये आकर्षक नक्षीकाम केलेल्या वस्तू दिसत आहेत. यामध्ये सर्वात जास्त आकर्षक आहेत ते म्हणजे अगदी खऱ्या सोन्याचे दिसावेत असे मुकुट. अगदी पुठ्ठय़ाच्या किंवा धातूच्या चपटय़ा मुकुटांपेक्षा ह्य़ा मुकुटांची नक्षी विशेष लक्ष वेधून घेणारी असल्याने याला लोक विशेष पसंती दर्शवीत आहेत. अगदी एक फुटापासून ते दहा फुटापर्यंतच्या मूर्तीसाठी हे मुकुट अडीचशे रुपयांपासून ते अगदी अडीच हजारांपर्यंतच्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. दागिन्यांमध्ये अजून एक आकर्षण म्हणजे विविध नक्षीकाम केलेली भिकबाळी. मोती, पोवळे आणि अमेरिकन हिऱ्यांनी लगडलेल्या भिकबाळी बाजारामध्ये प्रथमच आलेल्या आहेत. गणपतीच्या मूर्तीची सोंड ही त्याच्या आकारानसुार वेगळ्या आकाराने वळवलेली असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या सोंडपट्टी नीटपणे बसत नाहीत. त्यामुळे सोंडेच्या आकारानुसार पद्धतशीरपणे बसतील अशा विविध खडय़ांच्या सोंडपट्टय़ा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त हातातील तोडे, कानांच्या पाळ्यांमध्ये घालायचे दागिने, जान्हवे, आशीर्वाद देणाऱ्या हातांच्या मध्ये बसणारे खडय़ांचे स्वस्तिक असे आकर्षक दागिने बाजारामध्ये नव्या स्वरूपामध्ये आलेले आहेत, असे दादरचे दागिने विक्रेते धनेश पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

गौरीच्या दागिन्यांमध्ये ही एकदानी, ठुशी, पुतळ्या, कोल्हापुरी साज यांमध्ये थोडेसे नावीन्य आणून बाजारामध्ये विक्रीस आलेले आहेत. मात्र जुन्या धाटणीच्या दागिन्यांनाच लोक पसंती देत आहेत. बाजूबंद, कमरपट्टा, नथ, मुकुट आदी दागिन्यांच्या खडय़ाचे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल आहे.

ग्राहकांचा प्लास्टिकला नकार

या वर्षी आम्ही दुकानामध्ये शक्यतो प्लास्टिक वगळून अन्य सजावटीचा मालच विक्रीस ठेवलेला आहे. गणपतीसाठीचे सामान घेण्यासाठी आलेले लोकही आता कमीत कमी प्लास्टिक असेल अशा वस्तूंची मागणी करत असल्याचे दादरमधील विक्रेते धनेश पाटील यांनी सांगितले.