आर्थिक परिस्थिती, मार्गदर्शन, शिकवणीविना एरंगळमधील गौरीला दहावीत ९३ टक्के

दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपलीकडे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यानंतर आता या कामगिरीचे फार अप्रूप वाटेनासे झाले आहे. मात्र, मालाडपासून पाऊण तासावर असलेल्या एरंगळ गावातले वास्तव्य, पालिका शाळेतील शिक्षण आणि कुटुंबांची जेमतेम आर्थिक परिस्थिती अशा वातावरणात गौरी लाड या विद्यार्थिनीने दहावीला ९३.४० टक्के मिळवले आहेत. मुंबईत वर्षांनुवर्षे राहणाऱ्यांनाही माहीत नसलेल्या गावाला गौरीच्या या यशाने प्रकाशझोतात आणले आहे.

मुलगा दहावीत गेला की टीव्ही, पाहुणे या सगळ्यालाच घरात बंदी घातली जाते. हजारो रुपये खर्चून शिकवणी वर्ग लावले जातात.  मुलाने मन लावून अभ्यास करावा म्हणून पूरक वातावरणनिर्मिती घरात केली जाते; परंतु यापैकी काहीच वाटय़ाला न आलेल्या गौरीने शाळेतील शिक्षकांनी आणि घरच्या मंडळींनी अभ्यासाकरिता दिलेले प्रोत्साहन या बळावर दहावीत उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही अनेक छोटी गावे आणि पाडे आहेत. यातीलच एक एरंगळ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पाऊणेक तासाच्या अंतरावर वसलेले आहे. सध्या या गावात काहींनी बंगलेही बांधले आहेत. अशाच एका बंगल्याच्या देखभालीचे काम गौरीचे वडील करतात. या कामातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यात मुलींच्या शिक्षणाचे कोडकौतुक पुरविणे त्यांना बिलकूल शक्य नव्हते; पण हुशारीच्या बळावर आपल्या मुली नक्कीच चांगले काही तरी करतील असा त्यांचा दृढविश्वास. गौरीने त्यांचा तो विश्वास दहावीत चांगले गुण मिळवून सार्थ ठरवला. ‘‘गौरी कोणत्याही शिकवणुकीला जात नसल्यामुळे शाळेत नियमित आणि वेळेत हजर असायची. शाळेत दहावीला अधिकचे वर्ग घेऊन मार्गदर्शन केले जाते. या वर्गामध्ये मुलांकडून अभ्यासाची कसून तयारी करवून घेतली जाते. गौरी आधीपासूनच हुशार होती. त्याला शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाची जोड मिळाली,’’ असे या शाळेच्या मुख्याध्यापिका कविता वाडे यांनी सांगितले.  मुंबईपासून जवळ असले तरी हे गाव आजही अनेक वष्रे मागे आहे. येथील बोलीभाषाही वेगळी आहे. अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आव्हान येथील शिक्षकांसमोर असते; परंतु शाळेतील शिक्षक आणि कुटुंबीयांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याचे गौरी सांगते