रेरा प्राधिकरण आदेश; गौतम चटर्जी यांचा इशारा; ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल

ज्या विकासकाविरुद्ध तक्रार येईल त्याबाबत सुनावणी घेताना प्रकल्प रेंगाळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर नावानिशी ताशेरे ओढले जातील. म्हणजे

भविष्यात कुठलाही अधिकारी विनाकारण प्रकल्प रेंगाळत ठेवण्याची हिंमत दाखविणार नाही, असे रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणात प्रकल्पाची नोंदणी केल्यानंतर वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी विकासकाची आहे; परंतु प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात विकासकाची चूक नसेल आणि त्यास संबंधित यंत्रणेकडून त्यातही विशिष्ट अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जात असल्याचे लक्षात आल्यावर त्या अधिकाऱ्यावर ताशेरे ओढत आदेशातच नावाचा उल्लेख करून या अधिकाऱ्याविरुद्ध संबंधित विभागप्रमुखाकडे अहवाल पाठविला जाईल.  तसेच या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई होईल, याची काळजी घेतली जाणार असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

फक्त विकासकाविरुद्ध कारवाई करणे हे प्राधिकरणाचे उद्दिष्ट नाही. मात्र ग्राहकाला वेळेत घराचा ताबा मिळावा हे महत्त्वाचे आहे. त्यात येणाऱ्या अडचणी योग्य वाटल्या तर त्याची निश्चितच दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणाकडून दोन प्रकल्पांना मंजुरी

रेरा नियामक प्राधिकरणाचे संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजून ५२ मिनिटांनी मेयफेअर हौसिंग आणि रौनक ग्रुपने आपले अनुक्रमे टिटवाळा आणि ठाणे येथील गृहप्रकल्प नोंदविले. त्यानंतर अद्याप एकाही प्रकल्पाची नोंदणी झालेली नाही. या गृहप्रकल्पांना प्राधिकरणाने मंजुरी दिली असून त्यांना आपल्या प्रकल्पाची जाहिरात करता येणार आहे. याबाबत प्राधिकरणाचे सचिव वसंत प्रभू यांच्या डिजिटल सहीसह या दोन्ही विकासकांना नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे.