गौतम नवलखा यांची उच्च न्यायालयात कबुली

सत्य काय आहे, याचा शोध घेण्यासाठी, पुस्तकांच्या कामासाठी आपण नक्षलवाद्यांच्या संपर्कात होतो, अशी कबुली कथित नक्षलवादी समर्थक आणि  विचारवंत गौतम नवलखा यांच्यातर्फे सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

सहा पोलिसांच्या अपहरणप्रकरणी नक्षलवादी आणि सरकार यांच्यातील मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली होती, असेही नवलखा यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. शिवाय अशा व्यक्तीवर नक्षलवादाला खतपाणी घातल्याचा आरोप कसा काय ठेवला जाऊ शकतो? असा सवालही त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

राज्य सरकारच्या वतीने नवलखा यांच्या दाव्याला विरोध करण्यात आला. तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा सरकारच्या वतीने अ‍ॅड्. अरुण कामत पै यांनी केला. न्यायालयाने या प्रकरणी २६ एप्रिलला सविस्तर सुनावणी घेऊ, असे स्पष्ट करत नवलखा यांना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला.