गौतम नवलखा यांचा न्यायालयात युक्तिवाद

मुंबई : शहरी नक्षलवादप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचाही सहभाग असल्याचा एकही थेट पुरावा पुणे पोलीस सादर करू शकलेले नाहीत, असा दावा नवलखा यांच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. एवढेच नव्हे, तर नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या हिंसेविरोधात नवलखा यांनी केलेल्या लिखाणाचे ‘नोबेल’ पुरस्कारविजेते अमर्त्य सेन यांनीही कौतुक केले होते, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनास नकार दिल्यावर नवलखा आणि आनंद तेलतुंबडे या दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांच्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर शुक्रवारपासून एकत्रित सुनावणीला सुरुवात झाली. त्या वेळी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून नवलखा यांनी नक्षलवादी आणि सरकारमध्ये मध्यस्थी म्हणून काम केलेले आहे. त्यांनी नक्षलवाद्यांना शांतता राखण्यास सांगून त्यादृष्टीने सरकारशी बोलणी सुरू करण्यास सांगितल्याचा दावा नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराबाबत नवलखा यांनी जे लिखाण केले त्याचे अमर्त्य सेन यासारख्या विचारवंतांनी कौतुक केले, तर नक्षलवाद्यांकडून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला, याकडेही चौधरी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. पोलिसांनी नवलखा यांचा जबाबही अद्याप नोंदवलेला नाही. त्यांच्याविरोधातील पुरावे पोलीस मोहोरबंद पाकिटात सादर करू शकत नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांना या पुराव्यांबाबत आपली बाजू मांडणे कठीण होऊन बसले आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

सोमवारी तेलतुंबडे यांच्या याचिकेवरील युक्तिवाद न्यायालय ऐकणार आहे.