News Flash

ठाण्यात बिर्याणी महोत्सवाचे आयोजन

हातमाग आणि हस्तकला प्रदर्शन

बिर्याणी

बिर्याणी महोत्सव

भारतात प्रत्येक राज्याची स्वत:ची अशी एक विशेष खाद्य संस्कृती आहे. त्यातील काही खाद्यप्रकार आता देशभर लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्या आता पूर्ण देशाच्या झाल्या आहेत. त्यापैकी एक प्रमुख पदार्थ म्हणजे बिर्याणी. मूळ पर्शियातून मुघलांनी आणलेला हा पदार्थ बघता बघता आपल्या पसंतीला उतरला आणि लोकप्रियही झाला. नवी दिल्ली, लखनऊ, हैदराबाद ही ठिकाणे तर बिर्याणीप्रेमींसाठी वरदानच म्हणावी लागतील. बिर्याणीचे निरनिराळे प्रकार प्रचलित आहेत. ठाण्यात या आठवडय़ात आयोजित बिर्याणी महोत्सवात एकाच छताखाली हे सर्व प्रकार खवय्यांना मिळू शकतील. २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य इव्हेन्टस व टॅग या ठाण्यातील विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकारांचा समावेश असणाऱ्या संस्थेच्या वतीने बिर्याणी फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला असून त्यात दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी असे बिर्याणीचे विविध प्रकार उपलब्ध असतील. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारांत बिर्याणी मिळेल.

 • कधी? : २३ ते २५ फेब्रुवारी, वेळ : संध्या. ५ ते रात्री ११.
 • कुठे ? : शिवाजी मैदान, जांभळी नाका, ठाणे (प.)

क्रिकेटचे वेड हे भारतीयांच्या विशेषत: मुंबईकरांच्या नसानसात भिनलेले आहे. गल्लीबोळातील क्रिकेट असो किंवा स्टेडियमवर खेळले जाणारे सामने असोत क्रिक्रेटप्रेमी मुंबईकर त्यात उत्साहाने सहभागी होत असतो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण क्रिकेटमधील जे काही ज्ञान आहे ते आपल्यालाच आहे, अशा आविर्भावात प्रत्येकजण बोलत असतो. मुंबईकरांचे हेच क्रिकेटवेड  लक्षात घेऊन प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकादमीतर्फे ‘गावस्कर, तेंडुलकर, कोहली-क्रिकेट शो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती प्रसाद फणसे यांची असून द्वारकानाथ संझगिरी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. काही मान्यवर क्रिकेटपटूंचा सहभाग आणि दुर्मीळ ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण, क्रिकेटचे किस्से असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून कार्यक्रमासाठी सशुल्क प्रवेश आहे.

 • कधी?- रविवार, २५ फेब्रु., संध्या. ६.३०
 • कुठे?- पु.ल.देशपांडे कला अकादमीचे लघु नाटय़गृह, रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम)

 

हातमाग आणि हस्तकला प्रदर्शन

हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातील कलाकार/कारागिरांना एकत्र आणून त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आर्ट एक्स्पो संस्थेतर्फे मुंबईत हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  देशभरातील हातमाग आणि हस्तकला कलाकार आपली कला येथे सादर करणार आहेत. महोत्सवासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कधी-२४ फेब्रुवारी २०१८, सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सातपर्यंत (प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे.)
 • कुठे- छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जहांगीर कला दालनाजवळ

 

शिरीष पै काव्य कट्टा

आत्रेय संस्थेतर्फे शिरीष पै काव्य कट्टा उपक्रमाअंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककवी प्रशांत मोरे, कवयित्री अनुराधा नेरुरकर यात सहभागी होणार असून काव्यप्रेमी आणि रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कधी- शनिवार, २४ फेब्रुवारी, संध्याकाळी सहा वाजता
 • कुठे- बाजीप्रभू देशपांडे उद्यान (नारळीबाग), दादर चौपाटी, दादर (पश्चिम)

 

युवा संगीत महोत्सव

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने आचार्य रातंजनकर यांच्या स्मरणार्थ युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात ओंकार अग्निहोत्री (संवादिनी वादन), तरुण लाला (तबलावादन), प्रीती पंढरपूरकर- जोशी (गायन) हे युवा कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. शास्त्रीय संगीतातील गायनाची मेजवानी या वेळी रसिकांना मिळणार आहे.

 • कधी?- रविवार, २५ फेब्रुवारी, संध्याकाळी पाच वाजता
 • कुठे?- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, माटुंगा रोड, पश्चिम

 

आंतरभारती साहित्यसेतू संमेलन

नॅशनल लायब्ररी, पाणिनी फाउंडेशन, ज्योती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या आंतरभारती साहित्यसेतू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन डॉ. सूर्यबाला यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात डॉ. विजया वाड, एकनाथ आव्हाड, ज्योती कपिले आदींच्या पुस्तकाचे प्रकाशन, कथा अनुवादाच्या एका सृजनाच्या हा परिसंवाद, बहुभाषिक कवी संमेलन आणि अरविंद जगताप यांच्याशी गप्पा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनासाठी सर्व साहित्यप्रेमी आणि रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कधी?- रविवार, २५ फेब्रुवारी २०१८, सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत
 • कुठे?- नॅशनल लायब्ररी सभागृह, दुसरा मजला, स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे तलावासमोर, वांद्रे (पश्चिम)

 

सीता- एकपात्री प्रयोग

सीता ही पौराणिक व्यक्तिरेखा याआधी मुद्रित माध्यमातून वाचकांपुढे तसेच दूरचित्रवहिन्यांवरील मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांपुढे सादर झाली आहे. प्रत्येक लेखक किंवा कलाकार आपल्या पद्धतीने या पौराणिक व्यक्तिरेखांचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करत असतो.  देवदत्त पटनायक यांनी लिहिलेल्या सीता या कादंबरीवर आधारित सीता हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सौरभ ठाकरे दिग्दर्शित या कार्यक्रमात किरण पावसकर सीता सादर करणार आहेत. किरदार आर्ट्स फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना सशुल्क प्रवेश आहे.

 • कधी?- २३ फेब्रुवारी २०१८, रात्री आठ वाजता
 • कुठे?- स्टुडिओ तमाशा, बंगला क्रमांक ७६, आराम नगर भाग-२, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम)

 

नाइट स्काय मैफलीत पं. शरद साठे यांचे गायन

ग्वाल्हेर घराण्याचे ८८ वर्षीय ज्येष्ठ गायकख्याल गायक पं. शरद साठे यांच्या गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. फर्स्ट एडिशन आर्टने आयोजित केलेल्या या नाइट स्काय मैफलीत उत्तररात्री गायल्या जाणाऱ्या स्वरांची मैफल रंगणार आहे. श्रुतिंद्र कतागडे (तबला), सिद्धेश बिचोलकर (संवादिनी) पं. साठे यांना संगीतसाथ करणार आहेत. सर्वसाधारणपणे संगीत मैफलीत रात्रीचे राग सादर केले जात नाहीत, पण या मैफलीत पं. साठे रात्रीचे राग सादर करणार असून मैफलीसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

 • कधी?- शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०१८, रात्री साडेआठ वाजता
 • कुठे?- जी-५. ए, फाउंडेशन फॉर कन्टेंपररी कल्चर, महालक्ष्मी

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 2:59 am

Web Title: gavaskar tendulkar kohli cricket show
Next Stories
1 अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाला नग्न करून मारहाण
2 जोगेश्वरीच्या धील ईशांत कंपाऊंडमधील केमिकल कंपनीला भीषण आग
3 विदर्भातील गारपिटबाधित शेतकऱ्यांना तत्काळ भरपाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Just Now!
X