समाजाला काय द्यायचे आहे हे नाटककार आपल्या प्रतिभेतून ओळखतो आणि आपल्या नाटय़कलेच्या माध्यमातून छुपेपणाने तो समाजासमोर सादर करतो. समाजासमोरील हे सादरीकरण समाजाला नाटककाराशिवाय कोणीही देऊ शकत नाही. म्हणून नाटककारातील प्रतिभा खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांना डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, अच्युत गोडबोले, मंगला गोडबोले, विजय कुवळेकर, सुधीर जोगळेकर, डॉ. उदय निरगुडकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. सन्मानपत्र, एक लाखाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विविध विषयांवर भान ठेवून रत्नाकर मतकरी यांनी लिखाण केले. हे लिखाण करताना त्यांनी समाजाला सतत काही देण्याचा प्रयत्न केला. हे देताना त्यांच्या पत्नीने त्यांना लिखाणासाठी दिलेले स्वातंत्र्य खूप मोलाचे आहे, असे डॉ. मोहन आगाशे म्हणाले.  नाटक, सिनेमांवरील सेन्सॉरशिप अलीकडे खूप वाढत चालली आहे. ‘घाशीराम कोतवाल’पासून हे सुरू आहे. अलीकडे कलाकृत्3.ाी कोणती चांगली हे ठरवले जातेय. हे चिंताजनक आहे. असुरक्षित वाटण्याची भावना वाढीस लागली की अशा घटना घडतात. तसेच राजकारण्यांपुढे कोणता अजेंडा नसला की सांस्कृतिक घटनांना बडवले जाण्याचा कार्यक्रम हाती घेतला जात आहे. अशा घटनांचा वेळीच विचार होणे आवश्यक आहे, असे डॉ. आगाशे म्हणाले.

‘सर्जनशीलता प्रामाणिकपणे जपा’
‘कलावंताकडे सर्जनशीलता असते. ती त्याने प्रामाणिकपणे जपली, त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून काम केले, तर फार मोठे काम उभे राहते. त्याची आज गरज आहे. असे अलीकडे होते का, असे प्रश्न ज्येष्ठ दिग्दर्शक व सत्कारमूर्ती रत्नाकर मतकरी यांनी उपस्थित केले. साहित्यिक, कलावंताने सतत निर्भीडपणे विषय मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ त्याच्यावर सेन्सॉरशिप येईल म्हणून ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर नवीन विचार पुढे येणार नाही. समाज पुढे जाणार नाही. हीच चौकट मान्य केली तर त्यामधून हुकूमशाही वृत्ती बळावेल, अशी भीती मतकरी यांनी व्यक्त केली.