खशबू नारायण, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम, वेताळ, आर्य, दुष्टू दत्तू, अपूर्व अशा पात्रांच्या रंगतदार कहाण्यांनी अनेक पिढय़ांचे बालपण समृद्ध करणाऱ्या चांदोबा (मूळ तेलुगू आणि तमिळमधील चंदामामा) या नियतकालिकाचे शेकडो अंक, त्यांच्या डिजिटल प्रती, इतकेच नव्हे तर बौद्धिक संपदा हक्कांसंबंधी (कॉपीराइट) कागदपत्रे आदी माहिती सध्या मुंबईतील गोदामांत धूळ खात पडली आहे. हे नियतकाइलक चालवणारी जिओडेसिक लि. नावाची कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचा हा परिणाम आहे.  ८१२ कोटी रुपयांचा (१२५ दशलक्ष डॉलर) आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशातून काळा पैसा चलनात आणल्याच्या आरोपाखाली या कंपनीची मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर खात्याकडून चौकशी सुरू आहे.

बी. नागी रेड्डी आणि चक्रपाणि यांनी जुलै १९४७ मध्ये तेलुगू आणि तमिळ भाषेतील चंदामामा या नियतकालिकाची सुरुवात केली. १९९० च्या दशकापर्यंत चंदामामा १३ भारतीय प्रादेशिक भाषांमधून प्रसिद्ध होत होते. यात सिंधी, संस्कृत आणि सिंहली भाषांचाही समावेश होता. मात्र नव्या सहस्रकात चंदामामाचा प्रसार ओसरू लागला होता आणि जाहिरातींतून मिळणारे उत्पन्न घटू लागले होते. मार्च २००७ मध्ये नागी रेड्डी यांचे चिरंजीव बी. विश्वनाथ रेड्डी आणि मॉर्गन स्टॅन्ले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे माजी व्यवस्थापकीय संचालक विनोद सेठी यांच्याकडून जिओडेसिक लि.ने चंदामामामधील ९४ टक्के भागभांडवल १०.२ कोटी रुपयांत विकत घेतले. त्यानंतर जिओडेसिकने कार्नेगी मेलन विद्यापीठाचे प्रोफेसर राज रेड्डी आणि त्यांच्या चमूच्या मदतीने चंदामामाचे डिजिटायझेशन करण्याचा प्रयत्न केला. आयआयटी-मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरचे प्रोफेसर जी. व्ही श्रीकुमार यांच्या मदतीने नवे डिझाइन तयार करून घेऊन चंदामामा पुन्हा बाजारात उतरवण्याचा प्रयत्नही झाला. अमिताभ बच्चन हेदेखील चंदामामाचे चाहते आहेत. २००८ साली त्यांच्या मदतीने चंदामामाने मुंबईत ६०वा वर्धापन अंक बाजारात आणला. त्यानंतर एका आंतरराष्ट्रीय कंपनीने चंदामामाच्या पात्रांवर आधारित अ‍ॅनिमेटेड फिल्मची निर्मिती करण्याची तयारी दाखवली. पण निधीची कमतरता आणि नव्या मालकांकडून स्वारस्याचा अभाव यामुळे चंदामामा २०१३ मध्ये बंद पडले.

त्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उद्भवले.  किरण प्रकाश कुलकर्णी, प्रशांत मुळेकर आणि पंकज श्रीवास्तव या जिओडेसिकच्या तीन संचालकांना आणि दिनेश जाजोदिया या सनदी लेखापालाला अटक करण्यात आली. तपास यंत्रणांनी कंपनीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कंपनीने २००८ ते २०१३ या काळात बम्र्युडा आणि ब्रिटिश व्हर्जिन बेटे येथे बनावट कंपन्या स्थापन करून काळा पैसा चलनात आणल्याचे आरोप आहेत. एप्रिल २०१४ मध्ये कंपनी १५ फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड (एफसीसीबी) धारकांचे साधारण १००० कोटी रुपयांचे (१६२ दशलक्ष डॉलर) देणे भागवू न शकल्याने जून २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत लिक्विडेटरने (निवारक) जिओडेसिकची मालमत्ता ताब्यात घेतली.

सध्या अंधेरीतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ) येथे १०,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या गोदामातील १०० पोत्यांत चंदामामाचे छापिल आणि डिजिटल अंक, हाताने चित्रे रेखाटलेल्या ६००० कथा, विक्रम-वेताळचे ६४० भाग (एपिसोड्स), त्यांच्या बौद्धिक हक्क संपदेसंबंधी (कॉपीराइट) कागदपत्रे आदी बाबी बंदिस्त असून धूळ खात पडलेल्या आहेत. तपास यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्याकडे चंदामामाच्या मालमत्तेची किंमत ठरवू शकतील असे कॉपीराइटसंबंधी तज्ज्ञ नाहीत. तसेच तेथील एका कार्यालयाकडे १५०० कंपन्यांच्या दिवाळखोरीची प्रकरणे असून ती हाताळण्यास पुरेसे मनुष्यबळ नाही. तपास यंत्रणांचा तपास पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाकडून जिओडेसिकच्या अंतिम दिवाळखोरीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, चंदामामाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एल. सुबुरामण्यन यांनी सांगितले की, हे नियतकालिक म्हणजे अजूनही खजिना आहे. तो ब्रँड (नाममुद्रा) वाचवायला हवा होता. त्याला त्याच्या हक्काचे स्थान मिळाले नाही याचे वाईट वाटते. आजही माझ्याकडे चंदामामा विकत घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येतात. त्यात मोठी क्षमता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geodesic company rare copies key patents lie locked up in mumbai building
First published on: 16-07-2018 at 02:46 IST