02 March 2021

News Flash

मुंबईचा पहिला ‘अनभिषिक्त बंदसम्राट’

दोन दशके त्यांनी बंदच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सामान्य मुंबईकरांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोचवले

'अनभिषिक्त बंदसम्राट'

मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे ‘बंदसम्राट’ अशी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

फर्नांडिस म्हणजे बंद हे जणू समीकरणच झाले होते. फर्नांडिस यांच्यामुळेच ‘बंद’ हा शब्द इंग्रजी शब्दकोषामध्ये आणला गेला असं म्हटलं जात असे. अनेक कामगार संघटांनाचे नेतृत्व करताना फर्नांडिस यांनी कामागारांच्या मागण्यांसाठी बंदचे शस्त्र वापरले. त्यांची ओळख ‘जॉर्ज फर्नांडिस: बंदसम्राट’ अशी तयार झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७० च्या दशकामध्ये अनेकदा मुंबईमधील संघटित कामगारांनी बंदची हाक दिली आणि ती यशस्वी करुन दाखवली. फर्नांडिस यांनी वाहतूक संघटनांना त्याच्या मागण्यांसाठी बंद हा प्रभावी पर्याय असल्याची जाणीव करुन दिली. त्याच्या या बंदच्या हाकेला नंतर बेस्ट संघटना, रेल्वे तसेच टॅक्सी युनियन्सही आपलेसे केले. त्यामुळे जर सार्वजनिक प्रवासाची माध्यमेच बंदमध्ये सहभागी झाली तर तो बंद यशस्वी होतोच. जवळजवळ दोन दशके फर्नांडिस यांनी अशाप्रकारे बंदच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सामान्य मुंबईकरांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोचवले.

१९५८ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याआधीच मुंबईमध्ये पहिला बंद झाला होता. अर्थात या बंदचीही हाक फर्नांडिस यांनीच दिली होती. एका गाड्यांच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी कोणत्या युनियनमध्ये सहभागी व्हावे यावर कंपनीने निर्बंध घातल्यानंतर फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी बंद पुकारला होता. हा बंद शांततेत पार पडला. त्यानंतर १९६३, १९६४ आणि १९६६ साली वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबई बंद पडली. विशेष म्हणजे या तिन्ही वर्षी झालेले बंद हे ऑगस्ट महिन्यात झाले होते.

२० ऑगस्ट १९६३ साली पुकारण्यात आलेला बंद हा महानगरपालिकेच्या कामगारांनी पुकारला होता. या बंदचा परिणाम असा झाला की शहरातील सर्व व्यवहार ठप्प पडले आणि या दिवशी शहरामधील सर्व ६४ कापड गिरण्याही बंद राहिल्या होत्या. त्यानंतरचे दोन्ही बंद हे वाढत्या महागाईला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आले होते. या बंद दरम्यान फर्नांडिस दरवाढविरोधात, बेरोजगारीविरोध लढणारे नेते म्हणून समोर आले. नंतर नंतर सिनेमांमधूनही अशाप्रकारे प्रस्थापितांना आव्हान देणारा अभिनेता दिसून लागला. त्यातही अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या १९७० च्या दशकामधील अनेक सिनेमांमध्ये कामगारांनी काम बंद करुन केलेल्या बंदचे संदर्भ सिनेमात दिसू लागले.

१९७२ साली सरकारला दुष्काळावर योग्य ती उपाययोजना करता न आल्याने मुंबई बंद पडली. त्यानंतर १९७४ सालाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये मुंबईत सात मोठे बंद झाले. यामध्ये हजारोंच्या संख्येने बंदमध्ये सहभागी झालेले लोक पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाले. याच काळात झालेल्या एका बंदमध्ये तर मुंबई पुर्णपणे थांबली होती. रेल्वे रस्ते वाहतूक पुर्णपणे बंद, सर्व हॉटेल्स बंद होती. इतकेच काय तर एक पत्रही पोस्टाकडून त्या दिवशी पोहचवण्यात आले नव्हते. तर १९८२ साली गिरणी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई बंदची हाक दिली.

त्यानंतर मात्र कामागारांऐवजी राकीय पक्ष बंदला समर्थन देतात का यावर बंद किती यशस्वी होतो हे ठरू लागले. त्यातही १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्यानंतर १९८० च्या दशकामध्ये बंदला शिवसेनेचा पाठिंबा असेल तर बंद यशस्वी होतो असं चित्र हळूहळू तयार होऊ लागला. मुंबई बंद करायची असेल तर ती शिवसेनाच करू शकते असं चित्र या सुमारास तयार झालं. पण सर्वसामान्यांच्या हितासाठी मुंबई बंद पाडण्याची ताकद असणारी शिवसेनेआधीची ताकद म्हणून आजही जॉर्ज फर्नांडिस यांचीच आठवण येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:45 pm

Web Title: george fernandes use to be a king of mumbai bandh
Next Stories
1 कामगारांच्या अस्मितेसाठी लढा देणारा नेता आपण गमावला : शरद पवार
2 असा लढवय्या नेता पुन्हा होणार नाही, संजय राऊत यांची फर्नांडिस यांना श्रद्धांजली
3 २००९च्या धर्तीवर राज्यात काँग्रेस आघाडीला यश मिळेल!
Just Now!
X