प्रसिद्ध गिर्यारोहक गेरलिन्डे काल्टेनब्रुनर यांची खंत

‘‘सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर निसर्गाचे नाही तर मानवाचेच वादळ घोंगावत आहे, किंबहुना हा पर्वतच आज मुक्त होण्याची अपेक्षा करतोय की काय असे वाटते’’ असे खरमरीत भाष्य एव्हरेस्टवरील व्यापारीकरणाच्या पाश्र्वभूमीवर गेरलिन्डे काल्टेनब्रुनर या जगप्रसिद्ध महिला गिर्यारोहक यांनी केले. ऑस्ट्रियन गिर्यारोहक गेरलिन्डे यांनी जगभरातील आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या सर्वच्या सर्व १४ हिमशिखरांवर कृत्रिम प्राणवायूशिवाय यशस्वी आरोहण केले आहे. त्यामुळेच गिर्यारोहणातील व्यापारीकरणावरील त्यांचे भाष्य महत्त्वाचे ठरते. गेरलिन्डे ८-९ जुलैला महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे सुरू असलेल्या गिरिमित्र संमेलनासाठी आल्या आहेत. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी गिर्यारोहणातील वाढत्या व्यापारीकरणावर  भाष्य केले.

एव्हरेस्टच्या समोरच असणाऱ्या नुपुत्से या हिमशिखरावरील आरोहणादरम्यान त्यांनी एव्हरेस्टवर शिखरमाथ्याकडे निघालेल्या आरोहकांची लांबलचक रांग पाहिली आणि त्यांना एव्हरेस्टवरील या वाढत्या धोक्याची तीव्रता अधिकच प्रकर्षांने जाणवल्याचे त्या  नमूद करतात. कृत्रिम प्राणवायूचा अतिरेकी वापर आणि सर्व सुविधा पुरवणारी यंत्रणा आणि अनुनभवी गिर्यारोहक यामुळे एकूणच धोके खूप वाढल्याबद्दल त्या चिंता व्यक्त करतात.

एव्हरेस्टवरील सद्य:स्थितीवर भाष्य करताना त्यांनी त्यांच्या अष्टहजारी शिखर मोहिमेत एव्हरेस्टवर आरोहण करताना हे सर्व कसे टाळले यावर त्या सांगतात की, आमच्या चमूने एव्हरेस्टचा सर्वात लोकप्रिय आणि गर्दीचा दक्षिण खिंड मार्ग टाळून, कठीण आणि कमीत कमी वापरला गेलेला उत्तर धारेचा मार्ग वापरला. त्या वाटेवर कोणीच नव्हते. आपल्या कारकिर्दीवर भाष्य करताना त्या सांगतात की, विक्रम करणे हा उद्देश कधीच नसल्यामुळे सर्व शिखरांवर आरोहण केल्याचे त्यांनी सांगितले.