२०१० सालच्या पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालय कायम ठेवणार की नाही याचा निर्णय गुरुवारी होणार आहे. न्यायालय गुरुवारी त्यावर निर्णय देणार असून त्या वेळेस बेग याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बेगने फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शिवाय फाशीच्या शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले होते. या दोन्हींवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली व निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी असलेल्या बेगने सप्टेंबर २०१० मध्ये जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट घडवला होता, असे नमूद करत पुण्याच्या विशेष न्यायालयाने २०१३ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या स्फोटात १७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ५८ जण जखमी झाले होते. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता.