महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून याकाळात शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना केलेली मदत यासह करोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. राज्यातील पक्ष विस्तार व्हावा यासाठी आपल्या जिल्ह्य़ातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३० हजार सदस्यांची नोंदणी करा, असा आदेश मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांना दिला.

दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या वर्ष पूर्ण होण्यास एक महिना उरल्याने या काळात लोकांपर्यंत महाविकास आघाडी सरकारचे काम पोहोचवून पक्ष संघटना बळकट करण्याच्यादृष्टीने आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी-भावना जाणून घेण्यासाठी ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

यापुढे पंधरा दिवसांत-महिनाभरात अशारितीने नियमित अंतराने जिल्हाप्रमुखांशी संवाद साधण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पक्ष संघटनेचा विस्तार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ३० हजार सदस्य असतील यासाठी प्रयत्न करा, असा आदेश ठाकरे यांनी दिल्याने आगामी काळातील विविध निवडणुकांसाठी सज्ज राहण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचे सूचित झाले.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असले तरी शिवसेनेचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्य़ांत अडचणी येत असल्याचा सूर जिल्हाप्रमुखांनी लावला. तसेच अनेक ठिकाणी नगरपालिका-महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने राज्य सरकारने विकास कामांसाठी निधी द्यावा, अन्यथा निवडणुकीत अडचणी येतील याकडेही काही जिल्हाप्रमुखांनी लक्ष वेधले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. बहुतांश पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. पण करोनाचे संकट आणि काही जिल्ह्य़ांतील आचारसंहितेमुळे काही शेतकऱ्यांना तो लाभ मिळणे बाकी आहे. त्याबाबतही लवकरच अंमलबजावणी होईल.

निसर्ग चक्रीवादळ, विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी-पूरस्थिती अशा विविध संकटात सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे याकडे लक्ष ठेवा, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना सांगितले.

पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्य़ांत सेनेचा संपर्क मंत्री

ज्या जिल्ह्य़ांत शिवसेनेचा पालकमंत्री नाही अशा ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची-आमदारांनी सुचवलेली विविध विकास कामे व्हावीत यासाठी सेनेतर्फे  अशा जिल्ह्य़ांत संपर्क मंत्री नेमण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.