दुष्काळाचे निमित्त हातीशी धरून व्यापारी आणि दलाल यांनी पुन्हा एकदा बाजावरपेठेवर कब्जा केल्याने झपाटय़ाने वाढणाऱ्या डाळींच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याठी आता शिधावाटप पत्रिकेवर तूरडाळ देण्याची योजना अन्न व नागरी पुरवठा विभागाने आखली आहे. त्यानुसार राज्यात शिश्रापत्रिकेच्या माध्यमातून महिन्याला एक किंवा दोन किलो तिही बाजारभावापेक्षा २० रूपये कमी दराने तूरडाळ देण्याची योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यात सध्या तूरडाळीचा भाव प्रति किलो २०० रूपयांच्या पलिकडे गेला असून लोकांना दिलासा देण्यासाठी आता शिधावाटप योजनेच्या माध्यमातून तूरडाळ दिली जाणार आहे.
पांढरी शिधापत्रिका वगळता केशरी, पिवळ्या शिधापत्रिका धारकांना महिन्याला एक ते दोन किलो तूरडाळ देण्यात येणार आहे. त्याचा दरही बाजारभावापेक्षा १५ ते २० रूपये कमी आसेल. याबाबताच प्रस्ताव विभागाने तयार केला असून वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.
त्याचप्रमाणे डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर निंयत्रण ठेवण्यासाठी कायदाही करण्यात येणार असून विधि व न्याय विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आल्याची माहितीही सूत्रांनी
दिली.

नागपुरात १.६५ कोटींचा डाळीचा अवैध साठा जप्त
नागपूर: डाळींच्या वाढत्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी साठेबाजांवर कारवाई करण्यात येत असून नागपूर जिल्ह्य़ात पुरवठा विभागाने आज, शुक्रवारी १९०० क्विंटल तूरडाळ जप्त केली आहे. बाजारात या डाळीची किमंत १ कोटी ६५ लाख रुपये आहे. कामठी तालुक्यातील लिहिगाव येथील लक्ष्मी वेअर हाऊसच्या गोदामातून ही डाळ जप्त करण्यात आली.

 

केंद्र सरकार राज्यांना स्वस्त तूर डाळी देणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
किरकोळ बाजारात डाळींचे दर किलोमागे २०० रुपयांवर थडकले असल्याने केंद्र सरकार राज्यांना १० हजार टन तूर व उडीद डाळीचा साठा देणार आहे. केंद्राकडून तूर डाळ ६६ रुपये किलो या दराने तर उडीद डाळ ८२ रुपये किलो या दराने दिली जाणार आहे.
किरकोळ विक्रीत हे दर किलोमागे १२० रुपयांपुढे जाऊ नयेत, असेही केंद्राने राज्यांना बजावले आहे. अर्थात तूर डाळ केंद्राकडून ज्या किमतीत मिळणार आहे त्याच्या दुप्पट किमतीत ती विकली जाणार असल्याने ग्राहकांच्या फायद्यात कपातच होणार आहे.
केंद्राने २६ हजार टन तूर आणि उडीद डाळीची आयात करण्याचे ठरविले असून दोन्ही डाळींचा ५० हजार टनांचा राखीव साठा ठेवला जाणार आहे.