29 January 2020

News Flash

खाऊखुशाल : पानमंदिरातील घंटानाद

१९७२ पासून याच ठिकाणी बसून लोकांची तोंडं लाल आणि गोड करण्याचं काम विनोदकुमार तिवारी करीत आहेत.

बोरिवलीतील चंदावरकर रोडवरील ओम शांती चौकातून तुम्ही दिवसभरात केव्हाही गेलात तर तुम्हाला मोठय़ाने घंटा वाजल्याचा आवाज येईल. आजूबाजूला कुठे तरी मंदिर असावं, असा अनेकांचा समज होण्याची शक्यता आहे; पण हा घंटानाद पान मंदिरातून येतो. घंटावाला पान मंदिर हे ते ठिकाण. याची नोंद गिनिज बुकात झालेली आहे. १९७२ पासून याच ठिकाणी बसून लोकांची तोंडं लाल आणि गोड करण्याचं काम विनोदकुमार तिवारी करीत आहेत.

पान म्हटलं की तंबाखू आला; पण तिवारींचं तंबाखूवाचून काहीही अडत नाही. त्यांच्याकडे तंबाखूची पानं मिळतातच; पण दिवसभर इतर ‘फ्लेवर्स’च्या पानांचं व्यसन जडलेल्या लोकांचाच राबता असतो.

पान लावणं ही एक कला आहे, असं तिवारीजी मानतात. पानाचा पाया नीट रचला जात नाही तोवर पानामध्ये टाकलेल्या इतर पदार्थाना चव येत नाही. कारण पान नीट लागलं असेल तरच ते तोंडात विरघळतं नाही तर तुम्ही ते फक्त रवंथ करत बसता. त्यामुळे पानातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेला ‘कथ्था’ (कात) येथे दिवसातून दोन ते तीन वेळा लक्षपूर्वक तयार केला जातो. तसं पाहायला गेलं तर विडय़ाचे ५० प्रकार आहेत. पण येथे कोलकाता, बनारसी आणि मघई हे तीन विडे मिळतात. मघई हे बिहारमधील गयामधून येणारं आकाराने लहान असलेलं पान. अतिशय नाजूक असं हे पान जोडीने खाल्लं (म्हणजेच दोन पानं एकत्र) जातं.

चॉकलेट, मघई, कोलकाता, बनारसी, रसमलाई, ड्रायफ्रुट, छप्पन भोग, आइस गोला हे पानांचे विविध प्रकार येथे मिळतात. त्याशिवाय फळांमध्ये अननस, चिकू, पेरू, आंबा, मोहिनी, रातराणी, ऑरेंज, कैरी या फ्लेवर्सची पानंही आहेत. पान लावताना सर्वप्रथम कथ्था, चुना, स्टार, पानाची चटणी आणि स्वाद, सुगंधासाठी लक्षी चुरा टाकून या सर्व गोष्टी बोटाने एकत्रित करून ते मिश्रण संपूर्ण पानावर पसरवलं जातं. तिवारींच्या मते, पान असा एकमेव पदार्थ आहे ज्यामध्ये गोष्टी हाताच्या बोटाने एकत्रित केलेल्या लोकांना चालतात. बाकी सर्व पदार्थ एकत्रित करण्यासाठी चमचा तरी लागतो किंवा मग हातात काही तरी आवरण घालावं लागतं. त्यामुळे येथे स्वच्छतेकडेही लक्ष दिलं जातं. त्यानंतर मसाला मुरलेल्या पानावर बडिशेप, टुटीफ्रुटी, गुलकंद, चेरी, मसाला, केशर सल्ली, गुलाब पावडर, ड्रायफ्रुट्स, इलायची टाकून ते पान फोल्ड करून त्यावर चांदीचा वर्ख चढवला जातो आणि थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवलं जातं. साधारणपणे तास ते दीड तास थंड झालेलं गोड पान खायला चांगलं लागतं. पण तेच तंबाखूचं पान असेल तर लगेच खावं लागतं, नाही तर ते नरम पडतं. गोड पानाची मागणी आल्यानंतर पान बाहेर काढून त्यावर हव्या त्या ‘फ्लेवर्स’ची गोड चटणी टाकली जाते आणि घंटा वाजवून ग्राहकांना सुपूर्द केलं जातं.

आइस गोला हे पान वेगळं आहे. फ्रिजमध्ये थंडगार झालेलं पान काढून ते वरून मधोमध कापलं जातं आणि त्यामध्ये नावाप्रमाणेच आइस गोळा टाकला जातो. साखरेच्या घोळापासून तयार केलेला फ्लेवर्ड बर्फाचा गोळा कापलेल्या पानाच्या मध्ये ठेवून हे पान खायला दिलं जातं. काही क्षणांमध्येच हे पान तुमच्या तोंडात अक्षरश: वितळून जातं आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. तंबाखूपेक्षा फ्लेवर्ड पानाला मंडळी जास्त भाव देत असल्याने तुम्हाला येथे लोक पान खाऊन थुंकताना दिसत नाहीत. दहा रुपयांपासून ते अडिचशे रुपयांपर्यंतची पानं येथे मिळतात. कांदिवली येथेही पोयसर जिमाखान्यासमोर घंटावालाची शाखा आहे.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या तिवारीजींकडे १६९ देशांतील ४५० घंटा आहेत. या घंटा जमविण्यासाठी तब्बल वीस वर्षे त्यांना लागली. पूर्वी या घंटा दुकानात लटकत असत पण आता त्या शोकेसमध्ये विराजमान आहेत. २००३ मध्ये गिनिज बुकात नोंद झाल्यानंतर २००५ आणि २००९ मध्ये लिम्का बुकमध्ये घंटावाला पान मंदिरची नोंद झालेली आहे. विनोद तिवारीजींचा वाढदिवस १ मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनी असतो. त्याच दिवशी काही वर्षांपूर्वी त्यांना बाळासाहेब ठाकरेंसोबत एनबीसी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. हीच आपल्या मेहनतीची पावती त्यांना वाटते. त्यामुळे अशा या अनोख्या पानमंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवी.

घंटावाला पान मंदिर

  • कुठे – ओम शांती चौक, चंदावरकर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०० ०९२
  • कधी – सकाळी ८.३० ते रात्री १२.३० वाजेपर्यंत.

First Published on June 24, 2017 3:15 am

Web Title: ghantawala pan mandir borivali pan shop
Next Stories
1 पेट टॉक : कंपन्यांमधील ताणहर्ते
2 गांजा तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
3 लाभदायक गुंतवणुकीचा मार्ग कोणता?
X