24 November 2017

News Flash

आरोपी रणजित आगळे याला अटक

न्यायालयाने दिलासा न दिल्याने रविवारी रात्री पार्कसाइट पोलिसांनी त्याला अटक केली.

खास प्रतिनिधी मुंबई | Updated: September 13, 2017 4:26 AM

सिद्धीसाई दुर्घटना : अनुभव नसतानाही तळमजल्यावर विनाशकारी बदल

नेमके शिक्षण किंवा अनुभव नसतानाही अटक आरोपी रणजित आगळे याने घाटकोपर येथील सिद्धीसाई इमारतीच्या तळमजल्यावर विनाशकारी बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणीही केली, अशी माहिती पार्कसाइट पोलिसांच्या चौकशीतून समोर आली आहे. २५ जुल रोजी सिद्धीसाई इमारत कोसळली. त्यात १७ रहिवासी ठार झाले. याप्रकरणी पार्कसाइट पोलिसांनी मुख्य आरोपी सुनील शितपसह दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून आगळे यांचे नाव समोर आले होते. मात्र अटक टाळण्यासाठी आगळे फरार होता. सोबत न्यायालयात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. न्यायालयात त्याच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने दिलासा न दिल्याने रविवारी रात्री पार्कसाइट पोलिसांनी त्याला अटक केली.

मुख्य आरोपी शितप याचे इमारतीत चार फ्लॅट होते त्यापकी तळमजल्यावरील तीन फ्लॅट एकत्र करून ती जागा त्याने एका खासगी रुग्णालयाला भाडय़ाने दिली होती. अपघाताच्या महिनाभर आधीपासून इमारत तकलादू होईल असे बदल शितप याने सुरू केले होते. त्याने इमारतीचे सर्व आधारस्तंभ तोडून टाकले तसेच चहू बाजूच्या भिंतीही पाडल्या. त्याऐवजी लोखंडी खांबाचा टेकू दिला. हे लोखंडी खांब इमारतीचा भार पेलू शकले नाहीत आणि २५ जुल रोजी इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, असा निष्कर्ष पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या चौकशीत काढला आहे.

इमारतीच्या तळमजल्यावरील मूळ रचनेतील हे बदल आगळे यांनी सुचवले होते. बदलाचे आराखडे आगळे याने तयार करून शितप याला दिले होते. शितप यांच्या सांगण्यावरून आगळे याने अन्य मजुरांना हाताशी धरून हे बदल आरंभले होते, अशी माहिती पार्कसाइट पोलिसांच्या चौकशी व तपासातून पुढे आली आहे.

  • आगळे सजावटकार (इंटिरिअर डेकोरेटर) आहे. तो वास्तुविशारद किंवा अभियंता नाही. त्याच्याकडे पदव्याही नाहीत किंवा तितका तगडा अनुभवही नाही, अशी माहिती तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.
  • सिद्धीसाई इमारतीच्या तळमजल्यावर जे बदल केले गेले ते करण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव किंवा प्रशिक्षण अटक आरोपी आगळेकडे नाही, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली. आंगले यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on September 13, 2017 4:26 am

Web Title: ghatkopar building collapse accused ranjit agale arrested