घाटकोपर येथे सिद्धीसाई ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी आरोपी अनिल मंडल आणि सुनिल शितप यांच्या पोलीस कोठडीत ७ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी प्रथम शिवसेना नेता सुनिल शितप याला ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याला २ ऑगस्टपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली होती. आजच त्याची कोठडी संपणार असल्याने पुन्हा न्यायालयात दाखल केल्यानंतर या दोघांच्या कोठडीत वाढ करून ती ७ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

शितप याने या इमारतीच्या तळमजल्यावरील आपल्या मालकीच्या नर्सिंग होमच्या नुतणीकरणाचे काम सुरु केले होते. त्यासाठी या इमारतीच्या मुख्य खांबांची तोडफोड करण्यात आली होती, त्यामुळेच भार पेलवू न शकल्याने ही इमारत कोसळली होती. या नुतनीकरण्याच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी अनिल मंडल या मुकादमाकडे होती.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितांन भेट देऊन या प्रकरणी दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर यात बेघर झालेल्यांसाठी दुसरी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या इमारतीच्या पुनः उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले होते. यावेळी या इमारतीची मालकी पुन्हा सुनिल शितपकडे देण्यात येऊ नये, अशी मागणी येथील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याप्रकरणी भादंवि ३०२, ३०४ या कलमांतर्गत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

२५ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सिद्धीसाई ही ४ मजली इमारत कोसळली होती. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.

[jwplayer pfvhZXwj]