घाटकोपरमधील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरुच होतं. दोशी कुटुंबही चिंतेत होतं. पण कुठेतरी आशा जिवंत होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास दर्शन दोशी याचा फोन खणखणला. तो फोन इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले दर्शनचे बाबा राजेश दोशी (वय ५७) यांचा होता. मी श्वास घेऊ शकतो पण मला जागेवरून हलता येत नाही. ढिगाऱ्याखाली माझा पाय अडकला आहे, असं त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी बचावपथकाला माहिती दिली. त्यांनी १५ तासांनी राजेश यांना सुखरुप बाहेर काढलं.

घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली आणि एकच खळबळ उडाली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. स्थानिकांनी बचावकार्य सुरु केलं होतं. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी बचावकार्य हाती घेतलं. ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. दुसरीकडं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. बचाव पथकातील कर्मचारी ढिगाऱ्याखाली शोध घेत होते. एकेक मृतदेह बाहेर काढला जात होता. काहींच्या डोळ्यांमध्ये अजूनही आशा जिवंत होती. आपलं कुणी सापडतं का, याकडे डोळे लागले होते. ते पाणावलेलेही होते. २८ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. बचावकार्य सुरुच होतं. राजेशही ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांचा मुलगा दर्शन आणि पत्नी मंदिरात गेल्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले होते. पण आपले बाबा घरी होते. तेही ढिगाऱ्याखाली अडकल्यानं त्यांची चिंता वाढली होती. संध्याकाळी पाच वाजले तरी त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. पण काही मिनिटांतच दर्शनचा मोबाईल फोन वाजला. तो फोन त्याच्या बाबांचा म्हणजेच राजेश यांचा होता. त्यानं कापऱ्या हातानंच तो उचलला. समोरून बाबांचा आवाज आला. मी जिवंत आहे. मला श्वास घेता येत नाही. माझा पाय भिंतीखाली अडकला आहे. मला बाहेर काढायला सांगा, असे ते म्हणत होते. दर्शननं क्षणाचाही विलंब न करता त्याची माहिती बचाव पथकाला दिली. राजेश यांचा फोन सुरूच होता. त्यांनी मी कुठे अडकलो आहे, हे सांगितले. एनडीआरएफच्या पथकानं त्यांचा शोध घेतला आणि त्यांना सुखरुप बाहेर काढलं. मृत्यूवरही विजय मिळवणाऱ्या दोशींना जवळच्याच शांतिनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.