News Flash

पूलबंदीमुळे बेस्टला लाखोंचा फटका

घाटकोपरमधील बसफेऱ्यांचे नियोजन ढासळले

घाटकोपरमधील बसफेऱ्यांचे नियोजन ढासळले

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता अचानक बंद केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होतच आहेत, परंतु बेस्टचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. लक्ष्मीबाग नाल्यावरील हा जोडरस्ता घाटकोपर बस आगाराच्या जवळ असून या पुलावरून बेस्टच्या सुमारे अडीचशे गाडय़ा धावतात. त्यामुळे बेस्टच्या घाटकोपर आगारातील बसगाडय़ांचे नियोजन पुरते ढासळले आहे. त्यामुळे बेस्टला दिवसांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

आयआयटीच्या सर्वेक्षणात घाटकोपर, भायखळा, करीरोड व चिंचपोकळीचा पूल धोकादायक ठरवण्यात आले होते. त्यात घाटकोपर-अंधेरी जोड रस्ताजवळील लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर करीरोड, चिंचपोकळी व भायखळा हे पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे सांगण्यात आले होते. पूल विभागाने संबंधित विभाग कार्यालयांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर शुक्रवार, ३१ मे पासून घाटकोपरच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे अंधेरी-घाटकोपर जोडरस्त्याचाही वापर करता येणार नाही. पश्चिम उपनगरात जाणारा हा प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे बेस्ट बसगाडय़ांना मोठा वळसा घालून नियोजित स्थळी जावे लागत आहे.

घाटकोपर पूर्व व घाटकोपर पश्चिम येथील बहुतांशी बस गाडय़ांचे प्रवर्तन हे घाटकोपर आगारातूनच चालते. हा महत्त्वाचा पूल बंद झाल्यामुळे घाटकोपर आगारातूच रेल्वे स्थानक पश्चिम येथे जाण्यासाठी पंतनगर व घाटकोपर स्टेशन (पूर्व) येथून उड्डाणपुलाचा वापर करावा लागत आहे. पंतनगर येथील रस्ता निमुळता असल्याने व तेथे वडाळा-कासारवडवली मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. छोटी व मोठी वाहने एकत्र आल्याने घाटकोपर स्थानक पूर्व येथे ही वाहतूक कोंडी होत आहे.

घाटकोपर आगारातून घाटकोपर स्थानक पश्चिमेकडे जाणारे बस क्र. १० मर्यादित, ३०५, ३२९, ३८८ मर्या., ४१९, ४२१, ४७० मर्या., ५१७ मर्या., ४८८ मर्या. या मार्गावरील बसगाडय़ांना पंतनगर पोलीस स्टेशन घाटकोपर रेल्वे स्टेशन पूर्व मार्गे पश्चिमेकडे जावे लागणार आहे. घाटकोपर आगारातून लाल  बहादूर शास्त्री मार्गावर जाणाऱ्या बसगाडय़ा आता पूर्व द्रुतगती मार्गावरून गोदरेज, जोगेश्वरी विक्रोली लिंक मार्ग,  टागोरनगर, गांधीनगर मार्गे लांबचा वळसा घालून धावत आहेत. बेस्टच्या विक्रोळी आगारातील बसगाडय़ा रोज रात्री घाटकोपर स्थानकात पार्किंगसाठी येत होत्या. हा पूल बंद झाल्यामुळे आता पार्किंगसाठी बेस्टला दुसरी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 2:11 am

Web Title: ghatkopar bus
Next Stories
1 शाळेच्या विश्वस्तांवर ‘मार्कफिक्सिंग’चा आरोप
2 व्यवस्थेचा बळी?
3 मुंबईतील व्यापाऱ्यांवर अफूचा अंमल
Just Now!
X