मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज घाटकोपर-मानखुर्द (वीरमाता जिजाबाई भोसले मार्ग)वरील नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे,आयुक्त इक्बालसिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आपण आजया उड्डाणपुलाचं लोकार्पण करत आहोत, लोकार्पण हा शब्द महत्वाचा आहे. ज्या उड्डाणपुलावर आपण हा कार्यक्रम करत आहोत, मागील अनेक वर्षांपासून याचं काम सुरू होतं आणि हल्ली तर मी या रस्त्याने येणंच सोडून दिलं होतं. कारण इथं जी दुरावस्था होती, त्यामुळे इकडून येणं नको असं वाटायचं. पण आज हा उड्डाणपूल बघितल्यानंतर मला असं वाटतं की रोज या पूलावरून यावं जावं, एवढा सुंदर हा उड्डाणपूल केलेला आहे. राज्याला अभिमान वाटले असं हे काम आपल्या मनपाने केलं आहे.

या उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये –

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) – पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱ्या वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता. त्यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. सदर उड्डाणपूल हा शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा ३ मोठ्या नाल्यांवरुन जातो. या पुलाची एकूण लांबी २.९९१ किलोमीटर तर रुंदी २४.२ मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी ३ व दक्षिण वाहिनी ३ अशा एकूण ६ मार्गिका या पुलावर आहेत. या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने २४.२ मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

या पुलाच्या निर्मितीसाठी लागलेल्या साहित्याचा विचार करता एकूण १ लाख ०२ हजार २२५ घनमीटर काँक्रिट, १७ हजार १७५ मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), ४ हजार ४८६ मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), १ हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, ५८६ नग बेअरिंग्स आणि १० हजार ३६२ मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.