गिरीश कार्नाड यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ ‘दायाद’चे प्रकाशन

इतिहास समजून घ्यायचा असेल तर इतिहास वाचा. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कथा लिहिणाऱ्या लेखकाच्या कलात्मक स्वातंत्र्याला बंधने घालता येणार नाहीत, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते गिरीश कार्नाड यांनी सध्या सुरू असलेल्या वादांसंबंधी थेट भाष्य केले. इतिहासावर आधारलेल्या कलाकृतींनी कितपत वस्तुनिष्ठ राहावे यावर वातावरण पेटले असताना काही दशकांपूर्वी लिहिलेले ‘तुघलक’ या नाटकाचे त्यांनी स्मरण करून दिले. महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या नाटय़त्रयीच्या निर्मितीची कथा असलेल्या ‘दायाद’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश कार्नाड यांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ असलेल्या या पुस्तकाचे संपादक नाटककार प्रशांत दळवी आणि नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी या वेळी उपस्थित होते.

‘ययाती’नंतर नाटकासाठी ऐतिहासिक विषयाच्या शोधात असताना गिरीश कार्नाड यांना तुघलकाची कथा वेगळी वाटली. १३ व्या शतकात लोकांना सार्वजनिकरीत्या प्रार्थना करण्यास पाच वर्षे बंदी घालणाऱ्या तुघलकाची देवाधर्माबाबत काय मते असतील, या विचारांनी उद्युक्त होऊन कार्नाड यांनी ‘तुघलक’ लिहिले. इतिहास हा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असतो. कलाकार त्याला भावलेला इतिहास मांडतो, ते त्याचे स्वातंत्र्य असते, असे कार्नाड म्हणाले. सध्याची स्थिती, वाद पाहता जातव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणारा ‘संस्करण’सारखा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. ब्राह्मण समाजाच्या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट १९७० मध्ये प्रदर्शित होण्याआधी त्याला काही गटांकडून विरोध झाला होता. त्यावर मद्रास चित्रपट नियामक मंडळाने बंदीही घातली होती. मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही बंदी उठवली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला  अनेक पुरस्कार मिळाले. समाज कलाकृती स्वीकारतो, मात्र काही गट त्याला विरोध करतात. सद्य:स्थितीत अशा प्रकारचे चित्रपट करणे शक्य नसल्याचे कार्नाड यांनी सांगितले. ‘जाने भी दो यारो’ चित्रपट महाभारताच्या दृश्यांसह आजच्या काळात करता येणार नाही, असे अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी यापूर्वी सांगितले होते, तर ‘शोले’ पुन्हा करायचा असल्यास त्यातून धर्मेद्र देवाच्या आवाजात बोलत असल्याचा प्रसंग काढावा लागेल, असे मत लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले होते. ‘पद्मावती’वरून सुरू असलेल्या वादासंबंधीही कार्नाड यांनी मत मांडले. ‘पद्मावती’ची निर्मिती करताना संजय लीला भन्साळींना या वादाची कल्पना नसणार, असे म्हणता येत नाही.

कार्नाड म्हणाले..

सध्याची स्थिती, वाद पाहता जातव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणारा ‘संस्करण’सारखा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. ‘पद्मावती’ची निर्मिती करताना संजय लीला भन्साळींना या वादाची कल्पना नसणार, असे म्हणता येत नाही. कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वीरशैव समाजांत दोन हजार वर्षांपासून वाद आहेत. पण राजकीय कारणांसाठी ते वाद आता वाढवले गेले. राजकीय स्थिती बाजूलाच राहिली, मात्र हे वाद हाताबाहेर गेले आहेत.